कोरोनाचा विस्फोटः देशात विक्रमी २ लाख ७३ हजार नवे रुग्ण, १ हजार ६१९ मृत्यू

0
103

नवी दिल्लीः देशभरात रविवारी कोरोनाबाधित रुग्णांची विक्रमी संख्या आढळून आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सोमवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार रविवारीच्या २४ तासांत देशात २ लाख ७३ हजार ८१० पॉझिटिव्हा रुग्ण आढळून आले तर १ हजार ६१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तत्पूर्वी शनिवारीही देशात २ लाख ६१ हजार ५०० कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते तर १ हजार ५०१ रुग्णांचा मृत्यू झाला होता. देशात सलग पाच दिवसांपासून दोन लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत.

 देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता दीडकोटींहून अधिक झाली असून आतापर्यंत १ लाख ७८ हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १ कोटी २९ लाख रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या देशात १९ लाख २९ हजाराहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत.

महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटकात सर्वाधिकः देशातील काही राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि कर्नाटकात एका दिवसात विक्रमी कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात ६८ हजार ६३, दिल्लीत २५ हजार ४६२ आणि कर्नाटकात १९ हजार ०६७ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये १२ हजार ७९३ कोरोनाबाधित आढळले आहेत.

बेड्स, ऑक्सीजनची वाणवाः देशात कोरोनाचा संसर्ग एवढ्या वेगाने फैलावत आहेत की आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. रुग्णालयात बेड्स कमी पडू लागले आहेत. ऑक्सीजनचा तुटवडा भासत आहे. आयसीयू बेड्ससाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण भटकावे लागत आहे. याच दरम्यान, देशातील सर्वाधिक कोरोना प्रभावित १२ राज्यांत ऑक्सीजन पुरवठा वाढवण्यात आल्याचे केंद्र सरकारने रविवारी म्हटले आहे. केंद्र सरकारने उद्योगांसाठी ऑक्सीजन पुरवठा करण्यावर बंदी घातली आहे.

अवघ्या दहा दिवसांत दुप्पट रुग्णः भारतात मागच्या वर्षी ३० जानेवारीला पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. तेव्हापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ-घट होत राहिली. एका दिवशी एक लाखांहून अधिक रुग्ण आढळून येण्यासाठी ४२५ दिवस म्हणजेच १ वर्षे दोन महिन्यांचा कालावधी लागला होता. आता मात्र एक लाख रुग्णसंख्या दोन लाखांवर पोहोचवण्यासाठी केवळ दहा दिवसांचा कालावधी लागला आहे. ४ एप्रिलला देशात पहिल्यांदा एक लाखांहून अधिक रुग्ण आढळले होते. हीच संख्या १४ एप्रिल रोजी २ लाखांहून अधिक रुग्णांवर पोहोचली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा