देशात २ लाख ९५ हजार नवे कोरोना रुग्ण, २ हजार २३ मृत्यू

0
30

नवी दिल्लीः एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लॉकडाऊनचा शेवटचा पर्याय म्हणूनच वापर करा, असा सल्ला राज्य सरकारांना देत असतानाच देशातील कोरोना रुग्णांची संख्या काही कमी व्हायचे नाव घेत नाही. मंगळवारी देशभरात २ लाख ९५ हजार ४१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर २ हजार २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सलग सात दिवसांपासून देशात दोन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी एका दिवसात देशातील १ लाख ६७ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत देशात एकूण १ कोटी ५६ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनाने आतापर्यंत देशातील १ लाख ८२ हजार ५५३ बळी घेतला आहे. कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या स्थानावर आहे. सध्या देशात २१ लाख ५७ हजारांहून अधिक सक्रीय कोरोना रुग्ण आहेत.

मंगळवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून भाषण दिले होते. त्यात त्यांनी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणूनच वापरा, लॉकडाऊन करण्याची गरजच पडणार नाही, अशी पावले उचला, असा सल्ला राज्य सरकारांना दिला होता. शिवाय राष्ट्रीय स्तरावर लॉकडाऊनचा कोणताही विचार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता काही राज्यांनी लॉकडाऊन लागू केला आहे तर काही राज्ये लॉकडाऊन लागू करण्याचा विचार करत असतानाच प्रधानमंत्री मोदी यांनी हा सल्ला दिलेला आहे. महाराष्ट्रात मंगळवारी ६२ हजार ९७ नवे कोरोना रुग्ण आढळले तर ५१९ रुग्णांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सायंकाळी लॉकडाऊनची घोषणा करण्याची शक्यता आहे.

 दिल्लीमध्ये मंगळवारी विक्रमी  २८ हजार ३९५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत दिल्लीत एकाच दिवशी आढळलेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. दिल्लीत सध्या ८५ हजारांहून अधिक सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा ढेपाळली आहे. परिणामी सोमवारी रात्री १० वाजेपासून पुढील सोमवारपर्यंत दिल्लीत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आज महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा