राज्यातील नव्या रुग्णसंख्येत घटः आज ४८,६२१ रुग्ण, ५९,५०० जणांनी केली कोरोनावर मात

0
13
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबईः राज्यातील कोरोना संसर्गाचा जोर काही प्रमाणात ओसरताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ४८ हजार ६२१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर ५६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे आज दिवसभरात तब्बल ५९ हजार ५०० रुग्ण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ८७.७ टक्क्यांवर आला आहे.

 गेल्या काही दिवसांपासून राज्यात झपाट्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या आता थोडी स्थिरावताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४८ हजार ६२१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. काल रविवारी आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५६ हजार ६४७ होती. रविवारच्या तुलनेत आजच्या रुग्णसंख्येत तब्बल ८ हजार २६ ने घट झाली आहे. सध्या राज्यात ६ लाख ६५ हजार ८७० सक्रीय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सक्रीय रुग्णसंख्येच्या बाबतीत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ८ हजार ९१५ सक्रीय रुग्ण आहेत.  पुण्यानंतर नागपूर जिल्ह्यात ७० हजार १८६ सक्रीय रुग्ण आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सक्रीय रुग्णांची संक्या ५९ हजार ९७० आहे तर ठाणे जिल्ह्यात एकूण सक्रीय रुग्णांची संख्या ४७ हजार ४९१ आहे. राज्यात सर्वात कमी सक्रीय रुग्ण हिंगोली जिल्ह्यात आहेत. हिंगोलीत फक्त २ हजार २२८ सक्रीय रुग्ण आहेत.

 राज्यात आतापर्यंत २ कोटी ७८ लाख ६४ हजार ४२६ जणांचे स्वॅप तपासण्यात आले आहेत. त्यापैकी ४७ लाख ७१ हजार २२ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९ लाख ८ हजार ४९१ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर २८ हजार ५९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

दीडकोटींहून अधिक जणांचे लसीकरणः महाराष्ट्रात कालपर्यंत १ कोटी ६३ लाख ६२ हजार ८९५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. २ मे रोजी ३,७१८ लसीकरण सत्रांच्या माध्यमातून ४७,६९३ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा