राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणाः सोमवारपासून नवे निर्बंध; वाचा काय सुरू, काय बंद राहणार?

0
1808
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्यातील कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला असून निर्बंध आणखी कडक केले आहेत. नव्या निर्बंधांनुसार पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली असून रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक बाबी वगळता कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. नवीन निर्बंध सोमवार, १० जानेवारीपासून लागू होतील.

 राज्य सरकारने आज, शनिवारी नवीन निर्बंधाची सूचना जारी केली आहे. नव्या निर्बंधांत लग्न समारंभापासून ते सर्वच सार्वजनिक कार्यक्रमातील उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध घातले आहेत.

असे आहेत नवीन निर्बंधः

 • पहाटे ५ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र फिरता येणार नाही. म्हणजेच जमावबंदी लागू असेल.
 • रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत अत्यावश्यक बाबी वगळता कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही, प्रवास करता येणार नाही. म्हणजेच संचारबंदी लागू असेल.
 • लग्न समारंभात जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्याच उपस्थितीला परवानगी असेल.
 •  अत्यंविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहता येईल.
 • सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांना जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी असेल.
 • स्विमिंग पूल, स्पा, जिम, वेलनेस सेंटर्स आणि ब्युटी पार्लर्स बंद राहतील.
 • हेअर कटिंग सलूनला क्षमतेच्या ५० टक्के परवानगी असेल. रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत हेअर कटिंग सलून बंद राहतील. कोविड अनुरूप वर्तनाचे काटेकोर पालन करावे लागेल.
 • नाट्यगृह, सिनेमा थिएटर्स ५० टक्के क्षमतेने चालवता येणार. दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच परवानगी. रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद ठेवावी लागतील.
 • लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या व्यक्ती काम करताना आढळल्यास संबंधित हॉटेल, सलून, दुकान, रेस्टॉरंट मालकावर कारवाई करण्यात येईल.
 • पूर्वनियोजित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धावगळता अन्य क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात येतील. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत प्रेक्षक नसतील. सर्व खेळाडू व पदाधिकाऱ्यांसाठी बायो-बबल वापरावे लागेल. प्रत्येक तिसऱ्या दिवशी सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करावी लागेल.
 • शहर किंवा जिल्हास्तरीय क्रीडा शिबीर, स्पर्धा किंवा कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही.
 • प्राणी संग्रहालये, करमणूक पार्क, किल्ले किंवा अन्य तिकिट लावून असलेली ठिकाणे/ कार्यक्रम सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद असतील.

आवश्य वाचाः नवे निर्बंधः लेखी परवानगी असेल तरच शासकीय कार्यालयांत प्रवेश, खासगी कार्यालयांनाही हे नियम

हेही वाचाः अर्थशास्त्रात ‘कृतिका’र्थताः पात्रता नसताना खंदारेंची आज मुलाखत, उद्या नियुक्ती आणि तत्काळ रूजूवात

शॉपिंग मॉल्स/ मार्केट कॉम्प्लेक्सः शॉपिंग म़ॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील. रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद राहतील. क्षमता आणि आतमध्ये असलेल्या अभ्यागंतांची संख्या बाह्यदर्शनी फलकावर लावाली लागेल. संपूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांनाच परवानगी असेल.

रेस्टॉरंट्स/खाणावळीः क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. रात्री १० वाजता बंद होतील आणि सकाळी ८ वाजेपर्यंत बंद राहतील. एकूण क्षमता आणि सध्या आतमध्ये असलेल्या अभ्यागंतांची संख्या बाह्य दर्शनी भागावर लिहावी लागेल. संपूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांनाच परवानगी. संपूर्ण दिवसभर होम डिलिव्हरीला परवानगी असेल.

हेही वाचाः निवडणुकांचा बिगुल वाजला! पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे १० मार्च रोजी निकाल!

शाळा/महाविद्यालयेः शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील. मात्र, इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी बोर्डाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या विविध कृती कार्यक्रमांना परवानगी असेल.

वर्गातील शिकवणीखेरीज शिक्षकांच्या प्रशासकीय कामकाजाला परवानगी असेल. शालेय शिक्षण विभाग, कौशल्य विकास विभाग, उच्च व तंत्रशित्रण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग किंवा अन्य वैधानिक प्राधिकाऱ्याने परवानगी दिलेल्या बाबींना परवानगी असेल.

 देशांतर्गत प्रवासः राज्यात येणाऱ्या प्रवाश्यांना दोन्ही डोस किंवा पोहोचण्याच्या ७२ तास आधी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य असेल. हवाई वाहतूक, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीने प्रवास करणाऱ्यांसाठी हे लागू राहील.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

 सार्वजनिक वाहतूकः केवळ संपूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांनाच सार्वजनिक वाहतुकीने प्रवासाची परवानगी असेल. सार्वजनिक वाहतूक नियमति वेळेत सुरू राहील.

 यूपीएससी/एमपीएससी व अन्य स्पर्धा परीक्षाः राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धा परीक्षा केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार होतील. परीक्षेचे हॉलतिकिट हा परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्याचा वैध पुरावा असेल. राज्यस्तरावरील आधीच तारीख जाहीर झालेल्या आणि हॉलतिकिट जारी केलेल्या परीक्षा पूर्वनिर्धारित कार्यक्रमांनुसार होतील. पुढील सर्व परीक्षा एसडीएमएच्या पूर्वपरवानगीनेच आयोजित कराव्या लागतील.

शासकीय कार्यालयेः महत्त्वाच्या कामासाठी कार्यालय प्रमुखाच्या लेखी परवानगीविना आगंतुकांवर बंदी. कार्यालय प्रमुखांनी नागरीकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेची व्यवस्था करावी. बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीची व्यवस्था. कार्यालय प्रमुखांच्या गरजेनुसार वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत कार्यालयीन वेळेत कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे तसेच गरजेनुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळांमध्ये बदल करणे. याकरिता कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या वेळांमध्ये बदलाचाही विचार करू शकतील.

कार्यालय प्रमुखांनी कोविडरोधी वागणुकीचे काटेकोर पालन केले जाईल, याची काळजी घ्यावी. कार्यालय प्रमुखांनी थर्मल स्कॅनर्स, हँड सॅनिटायझर्स उपलब्ध करून द्यावेत.

खासगी कार्यालयेः कार्यालय व्यवस्थापनाने वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत कामकाजाच्या वेळा कमी कराव्यात. कार्यालयात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत, याचीही दक्षता घ्यावी तसेच कर्मचाऱ्यांसाठी वेळांमध्ये बदल करण्याचाही विचार करतील. तसेच कार्यालये २४ तास सुरू ठेवून टप्प्याटप्प्याने काम करण्याबाबतही विचार करावा.

कार्यालयीन कामकाजाच्या वेळा असामान्य असतील आणि त्यासाठी प्रवास करणे अत्यावश्यक असेल तर अत्यावश्यक कामासाठी ओळखपत्र दाखवून परवानगी मिळवता येऊ शकेल. अशाप्रकारचा निर्णय घेताना महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि सोयीचा विचार करणे बंधनकारक राहील.

लसीकरण पूर्ण केलेले कर्मचारीच कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील. लसीकरण पूर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन द्यायलाच हवे. कार्यालय व्यवस्थापनाने सर्व कर्मचारी सर्वकाळ कोविडरोधी वागणुकीचे तंतोतंत पालन करतील याची दक्षता घ्यावी. कार्यालय व्यवस्थापनाने थर्मल स्कॅनर्स, हँड सॅनिटायझर्स उपलब्ध करून द्यावेत.

कोरोनाचे दूत बनून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका- मुख्यमंत्र्यांची सादः आपण शाळा- महाविद्यालये परत ऑनलाईन केली आहेत. शिक्षण थांबणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यामुळं आपल्याला मिळालेली ही सुट्टी आहे असं समजून इकडे तिकडे अनावश्यक फिरून कोरोनाचे दूत बनू नका असेही आवाहन मी माझ्या तरुण मित्रांना करतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या विषाणूशी लढतांना आपल्याला दोन वर्षे झाली आहेत. या काळात आपण संसर्गाचा मोठ्या दोन लाटा अनुभवल्या आणि काळजीपूर्वक पाऊलं उचलत त्या रोखल्या सुद्धा. मात्र आता आपलं रूप बदलून आलेल्या विषाणूच्या संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, म्हणूनच तो किती धोकादायक आहे किंवा नाही यावर चर्चा न करता या संसर्गाला लवकरात लवकर थोपवणे गरजेचे आहे, अन्यथा आपल्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येऊ शकतो. याचमुळे वारंवार टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य विभाग यांच्याशी चर्चा करून तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्व संबंधितांशी विचार विनिमय करून आपण राज्यात काही निर्बंध लावण्याचे ठरवले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात नवे निर्बंध लागू करण्याच्या पार्श्वभूमीवर जनतेशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

रोजीरोटी नव्हे, गर्दी बंद करायची आहेः मी स्पष्ट करतो की, आपल्याला कुठलाही लॉकडाऊन करून सगळे ठप्प करायचे नाही. केवळ कायदे आणि नियम करून अशा आव्हानांचा मुकाबला होऊ शकणार नाही, तर प्रत्येक नागरिकाने मग तो समाजातला कुणीही घटक असो प्रत्येकानं आता ही लढाई अंतिम आहे आणि हा शेवटचा घाव कोरोनावर करायचाच अशा निश्चयानं आरोग्याचे नियम पाळायचे आहेत. आपल्याला काम बंद करायचे नाही तर गर्दी बंद करायची आहे. रोजी रोटी बंद करायची नाही, जीवन थांबू द्यायचे नाही पण काही बंधने पाळून या विषाणूपासून राज्य कायमचे मुक्त करायचे आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा