आंध्रमध्ये आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन, आधीच्या सर्व स्ट्रेनपेक्षा १५ पटींनी मृत्यूचा धोका जास्त!

0
217
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळेच गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असतानाच आंध्र प्रदेशात कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला असून हा स्ट्रेन देशात असलेल्या कोरोनाच्या स्ट्रेनपेक्षा १५ पट अधिक धोकादायक असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. या स्ट्रेनची लागण झालेला रुग्ण तीन ते चार दिवसांतच गंभीर होतो आणि फुफ्फुसापर्यंत श्वास पोहोचणेच बंद होते, त्यामुळे मृत्यूचा धोका पंधरा पटींनी वाढला आहे.

सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीच्या म्हणजेच सीसीएमबीच्या शास्त्रज्ञांनी हा नवा स्ट्रेन शोधून काढला असून त्याला एपी स्ट्रेन आणि एन४४०के असे नाव देण्यात आले आहे. एपी स्ट्रेन हा कोरोनाचा नवा विषाणू सध्याच्या व्हेरियंटपेक्षा अधिक घातक आहे. हा विषाणू रुग्णाला लगेच कवेत घेतो. त्यामुळे भविष्यात देशातील रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

एपी स्ट्रेन किंवा एन४४०के विषाणूची बाधा झालेल्या रुग्णाची प्रकृती तीन ते चार दिवसांतच खालावते. या रुग्णांना तीन-चार दिवसांतच हायपोक्सिया किंवा डिस्पानिया होता. अशा परिस्थितीत फुफ्फुसापर्यंत श्वास पोहोचणे बंद होते. योग्यवेळी उपचार आणि ऑक्सीजन सपोर्ट न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होतो. देशात गेल्या दिवसांमध्ये याच स्ट्रेनमुळे अधिक मृत्यू होत आहेत. हा स्ट्रेन तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत चालला आहे. व्यायाम आणि रोगप्रतिकारकशक्ती चांगली असलेल्या लोकांवरही हा स्ट्रेन भारी पडत आहे.

हा विषाणू सर्वात आधी आंध्र प्रदेशातील कुरनूलमध्ये आढळून आला. दक्षिण भारतात हा  वेगाने हातपाय पसरत चालला आहे. आंध्र प्रदेश, तेलंगण आणि कर्नाटक या राज्यांमध्ये या स्ट्रेनची बाधा झालेले रुग्ण आढळून येत आहेत. या स्ट्रेनची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये साइटोकाइन स्टॉर्मची समस्या निर्माण होते, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

दुसरी लाट होणार आणखी भयंकर?: सध्या देशात बी१६१७ आणि बी ११७ स्ट्रेनने बाधित झालेले रुग्ण आढळतात. सर्वाधिक रुग्णांना बी ११७ या स्ट्रेनची बाधा झालेली आहे. या दोन्ही स्ट्रेनपेक्षा एपी स्ट्रेन किंवा एन४४०के हा स्ट्रेन पंधरा पटींनी अधिक घातक असल्याचे निष्पन्न झाल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केल्यामुळे या विषाणू संसर्गाची साखळी वेळीच तोडली नाही तर दुसरी लाट आणखी भयंकर होण्याचा धोका आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा