औरंगाबादेत आजपासून ८ मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी, उगीचच फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

0
1088
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबादेत गेल्या काही दिवसांत वाढत चाललेली रुग्णसंख्या पाहता कोरोनाला अटकाव घालण्यासाठी आज मंगळवारपासून ८ मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ही संचारबंदी अंमलात राहील.

औरंगाबादेत तीनच दिवसांत ४७७ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात सोमवारी १३२, रविवारी २०१, शनिवारी आढळलेल्या १४४  रुग्णांचा समावेश आहे. कोरोना रुग्णांची ही संख्या वाढत चालल्याचे पाहून प्रशासनाने मोठे पाऊल उचलले असून आजपासून १४ मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.

जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, महापालिका आयुक्त आस्तिकुमार पांडे आणि पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांची आज संयुक्त बैठक झाली. या बैठकीनंतर औरंगाबादेत रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

औरंगाबाद आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण ४८ हजार ७७० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४६ हजार ५७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर आजपर्यंत १ हजार २५५ जणांचा मृत्यू झाला आहे.  सध्या ९४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

या बाबींना मनाई: कोणत्याही व्यक्तीला औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर, गल्लोगल्ली या ठिकाणी संचार, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे या सर्व कृत्यास मनाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक बाबी वगळता नागरिकांची हालचाल, आवागमन पूर्णपणे प्रतिबंधित राहील.

या बाबींना मुभा: सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा चालू राहतील (हॉस्पीटल, क्लिनिक, मेडिकल शॉपस्), औद्योगिक कारखाने चालू राहतील. कारखान्यातील कामगार व माल वाहतूक चालू राहील. अत्यावश्यक सेवा सुविधा चालू राहतील. पेट्रोल पंप सुरु राहतील. माल व मालवाहतूक या संबंधाने चढण व उतरण सेवा यांना परवानगी असेल. कॉल सेंटर कार्यालये, टॅक्सी, कार, ऑटो, ट्रान्सपोर्ट बसेस यांना परवानगी राहील.

खा. इम्तियाज जलीली पॉझिटिव्हः दरम्यान, औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी कोरोनाची लागण झाली आहे. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती खा. जलील यांनी स्वतःच दिली. तीन दिवसांपूर्वी जलील यांना काही लक्षणे जाणवत होती. त्यामुळे ते विलगीकरणात गेले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा