औरंगाबादेत शुक्रवारपासून रात्री ९ ऐवजी ८ वाजेपासून संचारबंदी, वाढत्या संसर्गामुळे नवे निर्बंध

0
1083
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता येत्या सोमवारपासून म्हणजेच १९ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत रात्री ८ वाजेपासूनच संचारबंदी लागू करण्यात आली असून वैद्यकीय सेवा आणि अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने आणि व्यवहार रात्री ८ वाजताच बंद करावे लागणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी आज हा संयुक्त आदेश जारी केला. सध्या शहरात रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी आहे. ती आता रात्री ८ वाजेपासून पहाटे ५ वाजेपर्यंत करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्‍य मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक महाराष्‍ट्र  शासन यांनी जाहीर केलेल्‍या मार्गदर्शक सुचनांनूसार कोरोनाग्रस्‍त रुगणाच्‍या इतर लोकांनी संपर्कात येवू नये तसेच सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी एकत्र येणे, थांबणे चर्चा करणे, कार्यक्रमाचे आयोजन करणे इत्यादी बाबींमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेऊन सर्वसामान्‍य जनतेच्‍या आरोग्‍याच्या हिताच्या दृष्टीने हा आदेश जारी करण्यात आला आहे.

हा मनाई आदेश १९ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत रात्री ८ वाजेपासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत वाजेपार्यत लागू राहतील. यामध्ये वैद्यकीय सेवा, वृत्तपत्रे, मीडिया संदर्भातील सेवा, दूध व्रिक्री व पुरवठा, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी,  रीक्षासह सर्व प्रकारच्या वाहतूकसेवा (खाजगी व शासकीय), बांधकामे, उद्योग व कारखाने, बँक व पोस्ट सेवा त्यांच्या नियमानुसार सेवा सुरू ठेवण्यास मुभा राहील, असे या आदेशात म्हटले आहे.

या आदेशानुसार पाच किंवा त्‍यापेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींना एकत्र येण्‍यास प्रतिबंध करण्‍यात येत आहे. अत्‍यावश्‍यक बाबी वगळता नागरिकांची हालचाल पूर्णपणे प्रतिबंधित राहतील. या आदेशाची अंमलबजावणी व कारवाई करण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेचे उपद्रव शोध व निर्मूलन पथकातील कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी व संबंधित वार्डाचे वार्ड अधिकारी व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे महानगरपालिकेचे सर्व संबंधित अधिकारी, सर्व संबंधित पोलीस हवालदार व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे पोलीस अधिकारी, विविक्षितपणे नेमलेले अधिकारी/कर्मचारी, ग्राम व नगरविकास विभागाचे सर्व अधिकरी/कर्मचारी आणि महसूल अधिकारी/कर्मचारी यांच्या मार्फत या आदेशाची अंमलबजावणी आणि कारवाई केली जाणार आहे.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्याविरुध्‍द  आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५२ ते ६० तसेच भा.दं.वि.चे कलम १८८ नुसार कायदेशीर कार्यवाही करण्‍यात येईल. वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्‍या कृत्‍यासाठी कुठल्‍याही अधिकारी व कर्मचारी यांच्‍यावर विरुध्‍द कुठल्‍याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा