लुटीला लगामः आला रुग्ण की कर सीटीस्कॅवर बंदी, आता कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट असणे बंधनकारक

0
268
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोनाच्या चाचण्या करण्यात येत असून त्याव्दारा कोरोनाचे अचूक निदान होत आहे. कोरोनाचे निदान करण्यासाठी सिटीस्कॅन (एचआरसीटी ) करु नये. एचआरसीटी करण्यासाठी रुग्णांकडे आरटीपीसीआर चाचणीचा पॉझिटिव्ह अहवाल असणे बंधनकारक आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. शहरातील सीटीस्कॅन केंद्रेच कोरोनाच्या समूह संसर्गाची केंद्रे बनली असल्याचे गंभीर निरीक्षणही त्यांनी नोंदवले आहे.

कोरोनाच्या निदानासाठी करण्यात येत असलेल्या सिटीस्कॅनच्या तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापरासंदर्भातील नियमावलीबाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हे निर्देश दिले. यावेळी मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, आयएमएचे डॉ. व्ही. रंजलकर, डॉ. यशवंत गाडे, निमाचे डॉ. गिरीश डागा,  डॉ. प्रवीण बेरड, डॉ. विजय चौधरी, रेडिऑलॉजिस्ट संघटनेचे डॉ. शरद कोंडेकर यांच्यासह सर्व संबंधित उपस्थित होते. 

हेही वाचाः औरंगाबादने गाठला एक लाख कोरोना रुग्णांचा टप्पा: आज १,४९२ नवे रुग्ण, २३ रुग्णांचा मृत्यू

कोरोनाबाधितांच्या उपचारासाठीच्या नियमावलीनुसार रुग्ण  तपासणीसाठी आरटीपीसीआर,ॲण्टीजेन चाचण्या आणि गरजेनुसार एक्सरे, रक्ताच्या नमुन्याच्या चाचण्याआधारे  ठरवून दिलेया पध्दतीने उपचार होणे गरजेचे आहे. सिटिस्कॅनचा वापर आवश्यक असेल अशा ऑक्सीजन पातळी  कमी झालेल्या, इतर गंभीर स्थितीतील कोरोना बाधितांसाठीच केला जावा, असे निर्देश जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिले.

सीटी स्कॅन केंद्रे बनली समूह संसर्गाची केंद्रेः गरज नसतांना कोरोना निदानासाठी लोकांकडून मोठ्या प्रमाणात सीटीस्कॅन केल्या जात असल्याने जिल्ह्यातील सिटीस्कॅन केंद्र समूह संसर्गाचे प्रमुख ठिकाण बनले असून तातडीने अनावश्यक सिटीस्कॅन थांबवण्याच्या सूचना केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील पाहणी दौऱ्यानंतर दिलेल्या आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व संबधितांनी कटाक्षाने खबरदारी घेत आरटीपीसीआर चाचणीचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त असलेल्या तसेच उपचार करत असलेल्या संबंधित डॉक्टरांनी संदर्भित केलेल्या तसेच आवश्यकता असलेल्या कोरोना बाधितांचेच सिटीस्कॅन करावे, असे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचाः ५०० रुपये भरा, वीज कनेक्शन घ्याः एससी, एसटीसाठी ‘डॉ. आंबेडकर जीवन प्रकाश योजना’

सीटीस्कॅन, रेमडेसिवीरची माहिती मनपाला देणे बंधनकारकः सीटीस्कॅन केलेल्या रूग्णांची माहिती विहित नमुन्यात सिटीस्कॅन  केंद्रानी महानगरपालिकेस नियमितपणे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर गरजेनुसार कोरोना उपचार नियमावलीप्रमाणेच करणे बंधनकारक असून रुग्णांच्या उपचारामध्ये करण्यात आलेल्या  इंजेक्शनच्या  वापराबाबतची माहिती विहित नमुन्यात सादर करावी. आवश्यकतेनुसार योग्य प्रमाणात योग्यवेळी ते रुग्णाला उपलब्ध करुन द्यावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

आधी रुग्ण दाखल करून घ्या, मग पैश्यांचे बघाः खाजगी रुग्णालयांनी शासन दरानुसार कोरोना उपचार करणे बंधनकारक असून अवाजवी दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. गंभीर स्थितीतील रुग्णाला दाखल करुन घेतांना रूग्णाच्या तब्येतीला स्थिर करण्यास प्राधान्य देवून त्यानंतर रुग्णालयात दाखल करुन घेण्याच्या आर्थिक बाबींची पूर्तता, किंवा परिस्थितीनुसार दुसरीकडे संदर्भित करण्याबाबतची प्रक्रिया करावी.  खासगी रुग्णालयामधील (डीसीएचसी) कोरोना रुग्णांच्या  मृत्यू बाबतची माहिती रुग्णालयांनी महानगरपालिकेस द्यावी. अशा रुग्णालयातील मृत्यूंचे विश्लेषण यंत्रणेमार्फत केल्या जाणार असल्याचेही चव्हाण म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा