राज्यात आता लॉकडाऊन नाही तर ‘ऑगमेंटेड रिस्ट्रिक्शन्स’, उच्चस्तरीय बैठकीनंतर टोपेंची माहिती

0
601

मुंबईः राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून पुन्हा एकदा लॉकडाऊन लावला जाण्याची चर्चा सुरू असतानाच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनबाबत महत्वाची खुलासा केला आहे. राज्यात आता लॉकडाऊनऐवजी ‘ऑगमेंटेड रिस्ट्रिक्शन्स’ लागू करण्याचा प्रस्ताव टास्क फोर्सने दिल्याची माहिती टोपे यांनी दिली.

राज्यातील नवीन कोरोना विषाणू सद्यस्थिती व उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम कुमार गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तथा आरोग्य सेवेचे आयुक्त एन. रामास्वामी यांच्यासह दुरदृश्य प्रणालीव्दारे कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. अजित देसाई उपस्थित होते.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

टास्क फोर्सने ऑगमेंटेड रिस्ट्रिक्शन्स असा शब्द वापरला आहे. म्हणजे अशीच संख्या वाढत गेली, तर लॉकडाऊनसारखा १०० टक्के बंद करण्याची आज तरी गरज नाही. पण अनावश्यक गोष्टींवर दररोजची रूग्णसंख्या तपासून बंधने आणता येतील का? याविषयीचा निर्णय घेतला जाईल. या विषाणूला रोखण्यासाठी गर्दी थांबवणे गरजेचे आहे. त्यानुसार गर्दी करणाऱ्या गोष्टींवर काही निर्बंध टाकण्यासाठी निर्णय घेतला जाईल. पण आजच त्यावर निर्बंध टाकले जातील, असे नाही. मुख्यमंत्र्यांना त्यावर माहिती दिली असून त्या त्यावेळी त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे टोपे यांनी या बैठकीनंतर सांगितले.

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला असल्याने परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे, इतर विभागांनी त्यांच्याशी समन्वयाने काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. योग्य प्रकाराच्या मास्कचा वापर, आरोग्य यंत्रणेकडील मनुष्यबळ, प्रमाणित उपचार पध्दती, विलगीकरण कालावधी आदी विषयांवर कोविड टास्कफोर्सच्या टीमसोबत उपमुख्यमंत्र्यांनी विस्तृत चर्चा केली.

हेही वाचाः तदर्थ प्राध्यापकांच्या सुरस कथाः नाट्यशास्त्रात अपात्र बंडगरांच्या नियुक्तीचा अवैध ‘एकपात्री प्रयोग’

राज्यातील कोरोना संसर्गाने बाधितांची संख्या वाढत आहे, ती आटोक्यात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देत चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी. सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवताना त्यांच्यावर आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून योग्य प्रकारे उपचार आणि देखरेख करण्यात यावी. कोरोनाची गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात बेडची उपलब्धता व्हावी, यासाठी कोविड रुग्णावर उपचारांसह देखभालीसाठी कोविड सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व कोविड रुग्णालये सज्ज ठेवण्यात यावीत. उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या अत्यावश्यक औषधांचा तुटवडा होऊ नये, त्याचा पुरवठा सुरळीत सुरु रहावा याची दक्षता घ्यावी. तसेच आरोग्य यंत्रणेत आवश्यक मनुष्यबळासंदर्भात आढावा घेऊन त्यासंदर्भात नियोजन करावे, अशा सूचना दिल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा