१८ वर्षांवरील लसीकरण मोहिमेचा फज्जा?, … ‘तर आरोग्यमंत्री हर्षवर्धन राजीनामा देणार का?’

0
316
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः मोदी सरकारने १ मेपासून देशातील १८ वर्षांवरीलन नागरिकांचे लसीकरण करण्याची घोषणा केली असली तरी भाजपची सत्ता असलेल्या गुजरात आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांनी लसींच्या उपलब्धतेअभावी तिसऱ्या टप्प्यातील ही लसीकरण मोहीम सुरू करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे १ तारखेपासून सुरू होणाऱ्या या लसीकरण मोहिमेचा फज्जा उडणार का? असा सवाल केला जात असून माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिंदबरम यांनी यावरूनच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यावर निशाणा साधला आहे. लसच नसल्यामुळे १ मेनंतर लोकांना लसीकरण केंद्रावरून हाकलून दिले गेले तर आरोग्यमंत्री राजीमाना देणार का? असा सवाल त्यांनी केला आहे.

१ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी  पुरेसे डोस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण करता येणार नाही, असे महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने आधीच म्हटले आहे. त्यात आता भाजप शासित राज्यांचीही भर पडली आहे. सीरम आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांशी आम्ही संपर्क केला. पण लसींचे डोस उपलब्ध नसल्यामुळे १ मेपापासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करणे शक्य होणार नाही. लसींचे डोस उपलब्ध होताच ही लसीकरण मोहीम सुरू केली जाईल, असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे.

गुजरात सरकारला सीरम इन्स्टिट्यूटकडून दोन कोटी डोसेस आणि भारत बायोटेककडून ५० लाख डोसेस मिळणार आहेत. पुढील पंधरा दिवसांत जेव्हा आम्हाला लसींचा साठा मिळेल, तेव्हा १८ वर्षांवरील नागरिकांनी  लस घ्यावी, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी म्हटले आहे.

तामिळनाडू सरकारनेही दोन कोटी डोसेसची ऑर्डर दिली आहे. परंतु जूनपर्यंत आमच्याकडे लस उपलब्ध होणार नाही, असे एका कंपनीने सांगितले आहे. त्यामुळे १ मेपासून लसीकरण मोहीम सुरू करण्याबाबत अनिश्चितता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

१० लाख डोस मिळेपर्यंत तिसरा टप्पा सुरू करणार नाही, असे पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीर सिंग यंनी म्हटले आहे. राजस्थानकडे लसीचा तुटवडा आहे. १५ मेपर्यंत लस उपलब्ध होणार नाही, असे लस उत्पादक कंपन्यांनी सांगितल्याचे राजस्थानचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी म्हटले आहे.

राज्यांकडे १ कोटी डोसेसः केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा दावा- केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मात्र राज्यांकडे १ कोटी डोसेस उपलब्ध असल्याचा दावा केला आहे. लसीकरण मोहिमेतील राज्यांच्या कामगिरीनुसार लसींचा पुरवठा केला जात आहे. आम्ही राज्यांना १६ कोटी डोसेस पुरवले. त्यापैकी १५ कोटी डोसेस दिले गेले. अजूनही राज्यांकडे १ कोटी डोसेस शिल्लक आहेत. लसीकरण सुरू झाल्यापासून लसींच्या पुरवठ्यात एकही दिवस खाडा झालेला नाही, असा दावा हर्षवर्धन यांनी केला आहे.

१ मे रोजी आरोग्यमंत्र्यांचा दावा हवेत उडून जाईलः माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी लसीकरण मोहिमेच्या या घोळावरून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यावर निशाणा साधला आहे. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना १ मे रोजी कसोटीवर ठेवले जाईल. राज्यांकडे पुरेशा प्रमाणात लसी उपलब्ध आहेत, हा त्यांचा आणि त्यांच्या सरकारचा दावा हवेत उडून जाईल. कोणतेही राज्य १८-४४ वर्षे वयाच्या लोकसंख्येचे लसीकरण सुरू करण्यास तयार दिसत नाही. एवढेच काय कोविन ऍपही सहकार्य करत नाही. जर लसींच्या अभावी १ मेनंतर लसीकरण केंद्रावरून लोकांना हाकलून दिले गेले तर आरोग्यमंत्री राजीनामा देतील का? असा सवाल चिदंबरम यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा