जमाव बंदीला हरताळः पहिल्याच दिवशी कुठेच दिसल्या नाही मुख्यमंत्र्यांचे आदेश राबवणाऱ्या यंत्रणा

0
20
प्रातिनिधिक छायाचित्र.

न्यूजटाऊन टीम/महाराष्ट्रः

ओमीक्रॉन विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी मध्यरात्रीपासून नवीन निर्बंध लागू केले. मात्र हे निर्बंध लागू केल्याच्या पहिल्याच रात्री मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा मात्र राज्यात कुठेही सक्रीय दिसल्या नाहीत.

रराज्यातील वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. ते शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमावर घोषणा केल्यानंतर तसे कायदेशीर आदेशही जारी केले. त्यातील एक विशेष बाब म्हणजे रात्री ९ वाजेपासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदीच्या आदेशाची तरतूद आहे.पण आजचे पहिल्याच दिवशीचे चित्र सकारात्मक नव्हते. आदेशाच्या पहिल्याच दिवशी अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा राज्यात कुठेही सक्रीय दिसल्या नाहीत.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

रात्री ९ वाजेनंतर राज्यातील सर्वच शहरातील रस्ते गजबजलेले होते. हॉटेल्सचे टेबल्सही फुल असल्याचेच चित्र न्यूजटाऊन टीमच्या पाहणीत आढळून आले आहे. सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, या नियमाला सर्रास हरताळ फासला गेला आहे. आता पुढील काळात तरी या अंमलबजावणी यंत्रणा या आदेशाचे पालन करतात की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचाः महाराष्ट्रात लॉकडाऊन नेमका केव्हा लागणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले उत्तर…

काय आहेत निर्बंध?

संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल.

लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्यावर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्यावर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.

इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.

हेही वाचाः धोक्याची घंटाः औरंगाबादेत आढळले दोन ओमीक्रॉन पॉझिटिव्ह रूग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क

उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशा ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.

उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.

याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी  त्यांनी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.

जमावबंदी म्हणजे नेमके काय?: जमावबंदी म्हणजे पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचे एकत्र येणे, एकत्र येऊन प्रवास करण्यावर बंदी. जमावबंदीच्या आदेशांत खासगी, सार्वजनिक ठिकाणांचा समावेश होतो. जमावबंदीचे आदेशही फौजदारी दंड संहितेच्या १४४ कलमान्वये जारी केले जातात. युद्ध, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती, एखादा अपघात किंवा करोनासारख्या साथरोग परिस्थितीत मानवी आयुष्याला धोका पोहोचेल अशा कृतीला आळा घालण्यासाठी फौजदारी दंड संहितेतील १४४ कलमान्वये पोलीस किंवा तत्सम प्राधिकाऱ्यांना जमावबंदी किंवा संचारबंदीचे आदेश जारी करता येतात. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचे अधिकारही तत्सम प्राधिकाऱ्यांना उपलब्ध होतात.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा