जगभरात ओमीक्रॉन झपाट्याने फैलावण्याचा धोका, दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आले हजारावर प्रवासी

0
182
प्रातिनिधिक छायाचित्र.

जिनिव्हा/मुंबईः दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या ओमीक्रॉन या नव्या व्हेरिएंटबद्दल जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) धोक्याचा इशारा जाहीर करण्यात आला आहे. ओमीक्रॉन हा अधिक धोकादायक ठरू शकतो. अगदी काही दिवसांतच हा विषाणू जगभरात हातपाय पसरू शकतो. जगाच्या काही भागांत त्याचे गंभीर परिणामही समोर येऊ शकतात, असे जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या टेक्निकल नोटमध्ये म्हटले आहे.

ओमीक्रॉन व्हेरिएंट बाधित रूग्णांच्या संख्येत एकाएकी जास्तीची वाढ झाली तर त्याचे अधिक गंभीर परिणाम पहायला मिळू शकतात, असा इशाराच जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. विशेष म्हणजे ओमीक्रॉनची बाधा झालेल्या एकाही रुग्णाचा अद्याप मृत्यू झाल्याची नोंद नाही.

चला उद्योजक बनाः राज्यात औद्योगिकदृष्ट्या अविकसित, विकसनशील भागांसाठी पीएसआय योजना, कसा घ्यायचा लाभ?

 कोरोना विषाणूचा B.1.1.529 हा नवा व्हेरिएंट सर्वात आधी दक्षिण आफ्रिकेत आढळून आला आहे. या व्हेरिएंटचे नाव ओमीक्रॉन असे ठेवण्यात आले. हा नवा व्हेरिएंट कोरोनाच्या अल्फा, बीटा, गॅमा या व्हेरिएंटपेक्षाही अधिक चिंताजनक श्रेणीत ठेवण्यात आला आहे.

आतापर्यंत दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, बोत्सवाना, ब्रिटन, ऑस्ट्रिया, डेन्मार्क, इस्रायल, बेल्जियम, झेक प्रजासत्ताक, इटली, जर्मनी आणि हाँगकाँग या देशांमध्ये ओमीक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत आढळून आलेल्या ओमीक्रॉन बाधित रुग्णांची संख्या १६० च्या आसपास आहे. युरोपातील अनेक देशातही ओमीक्रॉनचे अस्तित्व आढळून आले आहे. त्यामुळे जगभर दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी अनेक देशांनी आपल्या सीमा सील केल्या आहेत.

ओमीक्रॉन विषाणूचा फैलाव रोखणे फारस कठीण आहे. कारण शास्त्रज्ञांच्या मते हा व्हेरिएंट त्याला निष्प्रभावी करण्याच्या विरोधात गुण विकसित करतो. म्हणजेच या व्हेरिएंटला निष्प्रभावी करता येऊ शकणार नाही. या नवीन व्हेरिएंटचे म्यूटेशन प्रचंड विचित्र आहेत. त्यातील ३० म्यूटेशन तर केवळ प्रोटीनमध्येच आहेत, असे क्वाजालू नॅटॉल रिसर्च अँड इनोव्हेशन सिक्वेन्सिंग प्लॅटफॉर्मचे संचालक तूलिओ डी. ओलियोवीरा यांनी म्हटले आहे.

१९ दिवसांत दक्षिण आफ्रिकेतून हजारावर प्रवासी मुंबईतः ओमीक्रॉन विषाणू सापडलेल्या दक्षिण आफ्रिकेतून गेल्या १९ दिवसांत एक हजाराच्या आसपास प्रवासी मुंबईत आल्याची धक्कादायक माहिती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली. १० नोव्हेंबरपासून आजपर्यंत दक्षिण आफ्रिकेतून एक हजाराच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत. आतापर्यंत जे लोक मुंबईत आले आहेत, त्यांची माहिती आपण मिळवली आहे. जे मुंबईतच आहेत, त्यांना महापालिकेकडून फोन केले जात आहेत. त्याचबरोबर गेल्या १० दिवसांत परदेशातून आलेल्या सर्वांशी संपर्क साधून विचारपूस केली जात आहे. संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्थाही केली जात आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा