मुंबईत कोरोनाचा पहिला बळी, देशातील बळींची संख्या तीनवर

0
258
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः  कोरोनाने आज महाराष्ट्रातील पहिला बळी घेतला. मुंबईत उपचार सुरू असलेल्या एका ६४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. या व्यक्तीला कोरोनासह अन्य आजारही होते. मुंबईतील कस्तुरबा रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मुंबईतील या पहिल्या बळीमुळे कोरोनामुळे देशात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३ झाली आहे.

जगभरात धुमाकुळ घातलेल्या कोरोनाने भारतातही हातपाय पसरले आहेत. भारतात १२८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रात ही संख्या ३९ वर पोहोचली आहे. मुंबईत मृत्युमुखी पडलेला रूग्ण दुबईहून मुंबईत आल्याचे सांगण्यात येते. त्याच्याविषयी अन्य कोणताही तपशील उपलब्ध होऊ शकलेला नाही. कोरोनाने दिल्लीत एका महिलेचा आणि कर्नाटकात एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्रात आहेत.

सोमवारी कोरोना बाधित आढळलेला दुसरा रुग्ण हा नवी मुंबई येथे आला होता, तो फिलिपाईन्सचा नागरिक आहे. आजपर्यंत  फिलिपाईन्सहून नवी मुंबईत आलेल्या या १० जणांच्या चमूतील ३ जण कोरोना बाधित आढळले असून इतर ७ जण कोरोना निगेटिव्ह आढळले आहेत.पिंपरी चिंचवड मनपा ९, पुणे मनपा ७, मुंबई ६, नागपूर ४, यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण ३, रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद प्रत्येकी १ असे एकूण ३९ रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात सोमवारी ३१ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. १६ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर १६६३ विमानांमधील  १लाख ८९ हजार ८८८  प्रवासी तपासण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण १०६३  प्रवासी आले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ७९४ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी ७१७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३९ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा