कोरोनाची धास्तीः आयपीएल क्रिकेट स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली

0
85
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः येत्या २९ मार्चपासून सुरू होणारी आयपीएल क्रिकेट स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. देशात कोरोनाच्या फैलावाचा धोका वाढल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) हा निर्णय घेतला.

आयपीएल क्रिकेट सामने पाहण्यासाठी स्टेडियमवर ८० ते ९० हजार प्रेक्षक येतात. कोरोनाच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा तेरावा हंगाम स्थगित करण्यात यावा, यासाठी बीसीसीआयवर दबाव वाढला होता. लोकांच्या जीवांशी खेळू नका, असा सल्लाही काही वकिलांनी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना दिला होता. केंद्र सरकारनेही आयपीएल घेऊ नका, असा सल्ला बीसीसीआयला दिला होता. स्पर्धा घ्यायचीच असेल तर तिकिट विक्री न करता रिकाम्या स्टेडियमवर स्पर्धा घ्या, असा प्रस्ताव बीसीसीआयला देण्यात आला होता.

 कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी भारत सरकारने जगातील सर्व देशातील नागरिकांसाठी १५ एप्रिलपर्यंत व्हिसा निलंबित करण्याची घोषणा केल्यामुळे आयपीएलमध्ये परदेशी क्रिकेटपटूंना खेळणे अशक्य झाले होते. त्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली. बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आयपीएलच्या १३ व्या हंगामातील पहिला सामना २९ मार्च रोजी मुंबईत मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्या होणार होता. महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने राज्यातील सर्व स्पर्धा, सार्वजनिक कार्यक्रम आणि शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची घोषणा कालच केली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा