आता महाराष्ट्रातील सर्व मॉल्स बंद ठेवण्याचा निर्णय

0
40

मुंबई :  कोरोना विषाणू संसर्गाचा प्रतिबंध करण्याकरिता राज्य सरकारने अत्यावश्यक पावले उचलली असून राज्यातील शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्यासोबतच सर्व मॉल्स 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पूर्वनियोजित परीक्षा सुरु राहतील. ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये सुरु राहणार असून स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. दैनंदिन गरजेसाठी किराणा दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून या संकटाचा कुणीही दुरुपयोग करु नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समारोपानंतर विधिमंडळात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, संसदीय कार्यमंत्री अनिल परब उपस्थित होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी घाबारण्याची आवश्यकता नाही. राज्य सरकार आवश्यक ती दक्षता घेत आहे. जे रुग्ण आढळून आले आहेत. त्यांना लक्षणे सौम्य असून त्यांची तीव्रता वाढलेली नाही. त्यांची प्रकृती देखील स्थिर आहे, असे ठाकरे म्हणाले.

ज्या ठिकाणी गर्दी होते. अशा जागा बंद करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. नागरिकांनी वैयक्तीक काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. शुक्रवारी मध्यरात्रीपासून राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू झाला आहे. त्यानुसार शुक्रवारपासूनच सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, तरणतलाव बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या आदेशाचे जे पालन करणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. राज्यात काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी निवडणूक आयोगाशी चर्चा सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागरिकांनी मास्क लावून फिरण्याची आवश्यकता नाही. राज्यात कोरोनाचे जे रुग्ण दाखल आहेत, त्यांच्यावर शासकीय खर्चाने उपचार केले जात आहेत. ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल तेथे व्हेंटिलेटरची उपलब्धता करुन दिली जाईल, असे ठाकरे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा