औरंगाबाद मनपा निवडणुकीसह राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकाही पुढे ढकलणार

0
191
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून तातडीने पावले उचलण्यास सुरूवात केली असून गर्दी टाळण्यासाठी औरंगाबाद महानगर पालिकेच्या निवडणुकीसह राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकाही पुढे ढकलण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा सुरू केली आहे. केंद्र सरकारने कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर केलेली असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगालाही राज्य सरकारची ही विनंती मान्य करावी लागणार आहे.

 देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे. तर राज्य सरकारने खबरदारी म्हणून ग्रामीण भाग वगळता राज्यातील सर्व शाळा- महाविद्यालांना ३१ मार्चपर्यंत सुटी जाहीर केली आहे. राज्यातील मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव आणि जिम्सही बंद केल्या आहेत. राज्यात काही स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. औरंगाबाद महानगर पालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर व्हायचा आहे. ही निवडणूक एप्रिलमध्ये होणार आहे.

निवडणूक प्रचारासाठी होणाऱ्या नेत्यांच्या सभा, प्रचार फेऱ्या यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोगाशी बोलणी सुरू केली आहे. शनिवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समारोपानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच ही माहिती दिली. केंद्र सरकारने कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर केलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा ठेवलेला प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगालाही मान्य करावा लागणार आहे. येत्या दोन-चार दिवसांत याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा