औरंगाबादेत ११ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत अंशतः लॉकडाऊन, वाचा काय सुरू आणि काय बंद राहणार

0
2254

औरंगाबादः औरंगाबादेतील झपाट्याने वाढत असलेली कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता ११ मार्चच्या मध्यरात्री १२ वाजेपासून ४ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने रविवारी केली. प्रत्येक शनिवार व रविवारी संपूर्ण लॉकडाउन असणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. अंशतः लॉकडाऊनमुळे कोरोना आटोक्यात आला नाही तर पूर्णतः लॉकडाऊन करावा लागेल, असे इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

रविवार जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, मनपा आरोग्य अधिकारी, पोलिस आयुक्त, ग्रामीण पोलिस आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, घाटीच्या अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक आदींची बैठक जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या निवासस्थानी पार पडली. यानंतर पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी ही घोषणा केली.

अंशत: लॉकडाउनच्या काळात जर रुग्णसंख्या अधिक वाढली तर संपूर्ण लॉकडाउन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. याशिवाय खासगी व कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रत्येक १५ दिवसांनी करोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. त्या संबंधीचे प्रमाणपत्र देखील सर्वांनी सोबत बाळगणे आवश्यक राहणार असल्याचे चव्हाण म्हणाले.

शहरात गेल्या आठ दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांत वाढ होत आहे. याला पूर्ण लॉकडाऊन पर्याय उचित ठरणार नाही. म्हणून अंशत: लॉकडाऊन घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, असे चव्हाण म्हणाले. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी कडकडित लॉकडाऊन लागू राहणार असून या दिवशी फक्त शनिवारी व रविवारी केवळ वैद्यकीय सेवा, माध्यम कार्यालय, दूध विक्री, भाजीपाला, फळविक्री सुरू असणार आहे.

जाधववाडी मंडीमध्ये मोठी गर्दी पाहता कोरोना संसर्गाचा धोका सर्वात जास्त आहे. यासाठी पहिले सात दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत नियमांचे पालन न केल्यास पूर्णत: कडक लॉकडाऊन घेण्याचा निर्णय घ्यावा लागेल यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी  चव्हाण यांनी केले आहे.

अंशतः लॉकडाऊनच्या काळात कशावर बंदी, कशाला सूट?

बंदीः धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली, मिरवणुका, क्रीडा स्पर्धा, आठवडी बाजार, सभागृहे, मंगल कार्यालये, पूर्णत: बंद राहतील. क्रीडा स्पर्धांना कोरोना नियमांचे पालन करत सरावासाठी मुभा देण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये बंद राहणार असून ऑनलाईन शिक्षणाच पर्याय पूर्वीप्रमाणेच सुरु राहील.

मुभाः वैद्यकीय सेवा, वृत्तपत्रे, दुध, भाजीपाला विक्री, जिवनावश्यक सेवा, पशु खाद्य, बंका, वाहतुक सेवा, उद्योग, बांधकाम, किराणा दुकाने, गॅस, खाजगी कार्यालय सुरू राहतील.

सशर्थ परवानगीः हॉटेल व बार रात्री ९ वाजेपर्यंत क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांच्या अटीवर सुरु राहतील. तर लॉकडाऊन फूड पार्सल होम डिलिव्हरी सुविधा रात्री ११ वाजेपर्यंत सुरु राहतील. वाचनालये, अध्ययन कक्ष ५० टक्के क्षमतेवर सुरु राहतील. प्रत्येक दुकानदारांना प्रत्येक १५ दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य राहील.

 विवाह सोहळ्यांवर पूर्णतः बंदीः विवाह समारंभांना गर्दी होत असल्याने सर्व विवाह सोहळे पूर्णतः बंदी राहील, मात्र रजिस्टर विवाहांना मुभा राहील. दरम्यान, प्रत्येक शनिवार व रविवार रोजी १०० टक्के लॉकडाऊन राहणार आहे. या दोन्ही दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.पूर्णतः लॉकडाऊनची वेळ येऊ देऊ नकाः जिल्ह्यातील संसर्गाचे प्रमाण बदलते असून संसर्गामध्ये कुटुंबच्या कुटुंबे बाधित होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढत आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना आपत्तीचा प्रशासन यशस्वीरित्या सामना करत असून आजघडीला जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपचार सुविधा सज्ज आहे. मात्र याच गतीने संसर्ग वाढल्यास वाढीव रूग्णसंख्येच्या प्रमाणात उपचार सुविधा उपलब्ध करून देणे जिकरीचे ठरू शकते. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी वेळीच नागरीकांनी खबरदारी घेत हात धुणे, मास्कचा योग्य वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सामाजिक अंतराचे पालन या नियमांचे कटाक्षाने पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुर्ण लॉकडाऊनचा निर्णय नाईलाजाने प्रशासनास घ्यावा लागेल, अशी वेळी येऊ नये आणि सुरळीतपणे सर्व दैनंदिन व्यवहार, रोजगार सुरू राहण्याच्या दृष्टीने सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे चव्हाण म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा