प्लाझ्मा थेरपी कुचकामी, कोरोना रुग्णांना फायदा होत नसल्याने उपचारातून वगळली!

0
52
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारात देण्यात येणारी प्लाझ्मा थेरपी भारत सरकारने कोरोना महामारीच्या उपचाराच्या प्रोटोकॉलमधून वगळून टाकली आहे. एम्स, एमआयसीआर, कोरोनासाठी स्थापन करण्यात आलेला टास्क फोर्स आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. कोरोना उपचारात प्लाझ्मा थेरपी जेवढी प्रभावी असल्याचे सांगण्यात येत होते, तेवढी ती नसल्याचेच या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे.

कोरोना उपचारात प्लाझ्मा थेरपी तेवढीशी प्रभावी नाही. कोरोना उपचारात विनाकारण तिचा वापर केला जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपी सुरू ठेवण्याच्या बाजूने आम्ही नसल्याचे १६ मे रोजी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत सदस्यांनी सांगितले. टास्क फोर्सच्या शिफारशींनंतर आयसीएमआरने गाइडलाइन्स जारी केल्या असून आता कोरोना उपचाराच्या प्रोटोकॉलमधून प्लाझ्मा थेरपी वगळण्यात आली आहे.

 काही दिवसांपूर्वीच अनेक चिकित्सक आणि वैज्ञानिकांनी भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांना पत्र लिहून प्लाझ्मा थेरपीचा वापर अनावश्यक आणि अवैज्ञानिक असल्याचे म्हटले होते. प्लाझ्मा थेरपीबाबत जारी करण्यात आलेल्या गाइडलाइन्स कोरोना संसर्गाच्या प्रारंभीच्या टप्प्यातील होती, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपीचा कोणताही फायदा नाही. असे असतानाही देशभरातील रुग्णालयांत कोरोनावरील उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी वापरली जात आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना प्लाझ्मासाठी भटकावे लागत आहे, असेही चिकित्सकांनी या पत्रात म्हटले होते.

लान्सेट या वैद्यकीय संशोधनपत्रिकेत कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारात वापरण्यात येणाऱ्या प्लाझ्मा थेरपीबाबत एक संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला होता. व्यापक प्रमाणात घेतलेल्या चाचणीच्या आधारे हा संशोधन अहवाल तयार करण्यात आला होता. प्लाझ्मा दिल्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रकृतीत विशेष अशी कोणतीही सुधारणा होत नाही, असे या अहवालातून स्पष्ट झाले होते. चीन आणि नेदरलँडमध्येही असाच अहवाल आला होता. भारताने केलेल्या प्लासिड या मोठ्या चाचणीतही कोरोना उपचारात प्लाझ्मा थेरपी प्रभावी नसल्याचे स्पष्ट झाले होते.

काय असते प्लाझ्मा थेरपी?:  वैद्यकशास्त्राच्या भाषेत प्लाझ्मा थेरपीला प्लाझ्माफेरेसिस असे म्हटले जाते. कोरोना संसर्गातून बरे झालेल्या ज्या रुग्णांच्या रक्तात अँटीबॉडीज विकसित झालेल्या असतात, त्या रुग्णांचे रक्त घेऊन त्या रक्तातून प्लाझ्मा वेगळा केला जातो आणि तो कोरोनाबाधित रुग्णांना दिला जातो. हा प्लाझ्मा कोरोनाबाधित रुग्णांना दिल्यामुळे त्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती भक्कम होते आणि त्याच्या शरीराला कोरोनाच्या संसर्गाशी लढण्याला मदत मिळते, असे मानले जाते.

उपचारापेक्षा परिणाम भयंकरः कोरोनाबाधित रुग्णांवर सध्या वापरण्यात येत असलेल्या प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोनाचा अतिघातक विषाणू तयार होण्याची शक्यता आहे. असा विषाणू निर्माण झाल्यास सध्याच्या महामारीच्या काळात तो पेट्रोल ओतण्यासारखे ठरले, असा इशारा देशातील वैज्ञानिक आणि तज्ज्ञांनी मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांना लिहिलेल्या पत्रात दिला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा