मोदी म्हणतातः कोणताही बेजबाबदारपणा परवडणार नाही, आत्मसंतुष्टतेला जागा नाही!

0
111
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील कोरोना संसर्गाची परिस्थिती आणि लसीकरण मोहिमेसंबंधी उच्चस्तरीय बैठक घेतली. महाराष्ट्र आणि केरळमधील वाढत असलेली कोरोना रूग्णांची संख्या पाहता आत्मसंतुष्टतेला कोणतीही जागा उरणार नाही आणि कोणताही बेजबाबदारपणा परवडणार नाही, असे मोदी म्हणाले. आता महाराष्ट्रात मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने करणारा भाजप आपल्याच नेत्याच्या या सल्ल्यावर कोणतीही भूमिका घेते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मोदींनी कोविड इमर्जन्सी रिस्पॉन्स पॅकेज-२ अंतर्गत कोरोनाबाधित लहान मुलांच्या काळजीसाठी बेड्स क्षमतेची वाढीव स्थिती आणि इतर उपचार सुविधांचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील प्राथमिक देखभाल आणि ब्लॉकस्तरावरील पायाभूत आरोग्य सुवधांची पुनर्रचना आणि दिशा देण्याचा सल्लाही मोदींनी या बैठकीत दिला.

आवश्य वाचाः चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

 ग्रामीण भागातील परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी जिल्हास्तरावर कोविड, म्युकरमायकोसिस आणि लहान मुलांमधील एमआयएस-सी हा गंभीर आजार याच्याशी संबंधित उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांचा बफर स्टॉक करावा, असेही मोदी म्हणाले.

 देशात महाराष्ट्र आणि केरळच्या आकड्यांवर नजर टाकली असता आत्मसंतुष्टतेला जागा कोणतीही जागा उरणार नाही आणि कोणताही बेजबाबदारपणा परवडणार नाही, असे सांगतानाच सलग दहाव्या आठवड्यात देशाचा संक्रमण दर तीन टक्क्यांहून कमी असल्याचेही मोदी म्हणाले.

 देशात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट अद्यापही कायम असल्याचे या बैठकीच्या एक दिवस आधी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटले होते. देशातील ३५ जिल्ह्यांमध्ये आठवडी संक्रमणाचे प्रमाण १० टक्क्यांहून अधिक आहे तर ३० जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण ५ ते १० टक्के आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील पायाभूत आरोग्य सुविधांची पुनर्रचना आणि लसीकरणाला गती देण्याच्या विविध मार्गांवर या उच्चस्तरीय बैठकीत चर्चा झाली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा