राज्यातील २५ जिल्ह्यांतील निर्बंध पूर्णतः उठवणार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा

0
447

मुंबईः राज्यातील कोरोना रूग्णांची घटत चाललेली संख्या लक्षात घेता राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात येणार आहे. उर्वरित ११ जिल्ह्यांमध्ये मात्र निर्बंधात कोणतीही शिथिलता दिली जाणार नाही, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केली.

राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट आहे, अशा जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध शिथील करण्यात यावेत, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाची बैठक घेतली. या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

 ज्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील केले जाणार आहेत, तेथील रुग्णसंख्या वाढली किंवा परिस्थिती बिघडली तर स्थानिक प्रशासन तेथील निर्बंध वाढवेल,असेही राजेश टोपे म्हणाले. निर्बंध शिथिलतेचा अंतिम प्रस्ताव तयार करून तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर येत्या एक दोन दिवसांत शासन आदेश जारी करण्यात येईल, असे टोपे म्हणाले.

 निर्बंध शिथील होणारे २५ जिल्हे कोणते?: कोरोना रुग्णसंख्या घटत असलेल्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या २५ जिल्ह्यांमध्ये सध्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. त्या निर्बंधांतून या २५ जिल्ह्यांना सूट दिली जाणार आहे, असे टोपे म्हणाले.

 या ११ जिल्ह्यांत निर्बंध कायमः पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, बीड आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये मात्र निर्बंध कायम राहणार आहेत. परिस्थिती पाहून या जिल्ह्यांमधील निर्बंध वाढवले जाऊ शकतात, असेही टोपे म्हणाले. हे ११ जिल्हे वगळता उर्वरित २५ जिल्हे निर्बंधमुक्त होणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा