औरंगाबादकरांना दररोज सायंकाळी ५ ते ८ या वेळात खरेदी करता येणार दूध आणि फळे

0
159

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने किराणा दुकाने आणि भाजीपाला विक्रीसह अत्यावश्यक सेवांच्या वेळा सकाळी ७ वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत मर्यादित केल्या आहेत. मात्र दूध आणि फळे विक्रीसाठी सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंतची मुभा देण्यात आली आहे.  

दरम्यान, जिल्ह्यातील वाढता संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून त्या दृष्टीने प्रशासनामार्फत जारी करण्यात आलेल्या संचारबंदीच्या सुधारित वेळ मर्यादेचे कटाक्षाने पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी येथे केले.

‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत जारी करण्यात आलेल्या सुधारित वेळ मर्यादेच्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अपर जिल्हाधिकारी डॉ. अंनत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, अन्न औषध प्रशासन सहआयुक्त संजय काळे, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, डीसीपी निकेश खाटमोडे आदी उपस्थित होते.

राज्य सरकारने १४ एप्रिलपासून ब्रेक दि चेनचे आदेश जारी केले आहेत. मात्र  तरीही मोठया प्रमाणात कामाशिवाय नागरिक घराबाहेर पडत असल्याचे आढळून आले. कोरोनाचा संर्सग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमाचे पालने करणे गरजेचे असून वाढती गर्दी कमी होण्याच्या उदेशाने पोलिस आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाने एकत्रित सुधारित कालमर्यादेचे आदेश १६ एप्रिलला जारी केले आहे. लोकप्रतिनिधी आणि व्यापारी वर्गानेही या सुधारित कालमर्यादेस सहकार्य करत पाठिंबा दर्शविला आहे. त्यानुसार सकाळी ७ ते दुपारी १ या कालावधीतच नागरिकांना किराणा सामान, भाजीपाला, पेट्रोल खरेदी इत्यादीसाठी घराबाहेर पडता येईल. त्यानंतर कोणत्याही कारणास्तव नागरिकांनी कालमर्यादेचे उल्लघंन करु नये, असे चव्हाण म्हणाले.

जिल्ह्यातील रुग्णसंख्येचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येकाने जबाबदारीने स्वयंशिस्त पाळणे हे आजच्या घडीला सर्वाधिक महत्वाचे आहे. कारण याचप्रमाणात रुग्णसंख्या वाढत राहिली तर त्या प्रमाणात खाटा, अत्यावश्यक सुविधा उपलब्ध ठेवणे हे भविष्यात जिकरीचे बनेल. तरी जीवितहानीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करुन सुधारित वेळ मर्यादा कटाक्षाने पाळावी. कामाशिवाय दुपारी १ नंतर घराबाहेर पडू नये. बाहेर पडताना कोविड नियमावली, मास्कचा वापर आवर्जून करावा, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.

सर्वसामान्य नागरिकांना दुपारी १ वाजेपर्यंतच पेट्रोलः विनाकारण घराबाहेर पडून नियमाचे उल्लंघन केल्यास दंडतमाक कारवाई केल्या जाईल. संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करुन घेण्याच्या दृष्टीने प्रशासनामार्फत नियंत्रण अधिकारी, पोलीस पथक नियुक्त करण्यात आले आहे. तसेच पेट्रोल पंपावर दुपारी १ वाजेनंतर शासकीय वाहने, पोलीस, आरोग्य, इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनाव्यतिरिक्त इतर कोणालाही पेट्रोल विक्री करता येणार नाही.

परवानगी असलेले उद्योगच सुरूः जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरन्ट संचारबंदी कालावधीत बंद राहणार असून फक्त घरपोच पार्सल सेवा सुरू राहील. सर्व आठवडी बाजार १ मेपर्यंत बंद राहतील. ज्या उद्योगांना परवानगी आहे केवळ तेच उद्योग नियमांच्या अधीन सुरू राहतील. संबंधित कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे.

रमजानमुळे सायंकाळी फळविक्रीस मुभाः सर्व दुकानदार, आस्थापना व इतरांना आरटीपीसीआर, अँटीजन चाचण्या, लसीकरण या बाबींची पूर्तता यापूर्वीच्या नियमांनुसार बंधनकारक राहील. या कालावधीत पूर्वीप्रमाणेच धार्मिक स्थळी केवळ नियमित पूजापाठ करता येईल. मात्र सामूहिक पूजा, धार्मिक कार्यक्रम बंद राहतील. त्याप्रमाणे सुधारित कालमर्यादेत सध्या रमजान सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांसाठी सकाळी ०७ ते दुपारी १ यासोबत सायंकाळी ५  ते ८ या कालावधीत दूध, फळविक्री व्यवस्था सुरू राहील, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

रेमडेसिवीरसाठी व्हॉट्सअॅप नंबरः सर्व खासगी रुग्णालयांनी कोरोना नियमावलीचे पालन करुन रुग्णांची वर्गवारी करत उपलब्ध रेमडीसिवीर इंजेक्शन गंभीर रुग्णांना प्राधान्याने गरजेनुसार द्यावे. याबाबतची माहिती विहित नमुन्यात जिल्हा प्रशासनास सादर करणे बंधनकारक असून ज्या खासगी रुग्णालयांना रेमडेसिवीरची आवश्यकता आहे त्यांनी त्यासाठी रुग्णनिहाय आपली मागणी सविस्तर अर्जाद्वारे जिल्हाधिकारी मदत कक्षात सायंकाळी ६ वाजेपर्यंत (०२४०-२३३१२००), तसेच अन्न व औषध प्रशासनचे निरिक्षक बजाज ९४२२४९९४४१ या क्रमांकावर व्हॉटस्ॲपद्वारे करावी.संबंधित प्राप्त अर्जांची अन्न औषध प्रशासन विभागामार्फत तपासणी करून त्यानंतर घाटीच्या औषध विभागात पात्र अर्ज संदर्भित केल्या जातील. त्यातील रुग्णांच्या गरजेनुसार रूग्णालयास डॉ. माधुरी कुलकर्णी यांच्यामार्फत रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्यात येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिकरित्या रुग्णांच्या नातेवाईकांनी मदत कक्षात इंजेक्शनची मागणी करु नये. खाजगी रुग्णालयामार्फतच इंजेक्शन मागणी केल्यास त्यावर योग्य ती कार्यवाही केल्या जाणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

काय म्हणाले जिल्हाधिकारी? ऐका त्यांच्याच शब्दांत

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा