औरंगाबाद शहर उद्यापासून पूर्णतः अनलॉक, सकाळी ७ वाजेपासून सुरू होणार नियमित व्यवहार

0
724
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील निर्बंध पूर्णतः उठवण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतला असून त्याबाबतचे आदेश आज जारी करण्यात आले आहेत. औरंगाबाद महापालिका क्षेत्रातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर २.२४ टक्के आणि भरलेल्या ऑक्सीजन बेड्सची संख्या २२.१९ टक्के असल्यामुळे औरंगाबाद महापालिका क्षेत्र शासनाने निर्धारित केलेल्या पहिल्या गटात समाविष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील निर्बंध पूर्णतः शिथील करण्यात आले आहेत.

औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात ७ जूनच्या सकाळी ७ वाजेपासून नवीन सुधारित आदेश लागू होतील.

अत्यावश्यक वस्तू व सेवा संबंधी व्यवसाय व दुकानेः अत्यावश्यक सेवा आणि व्यवसायाची दुकाने नियमितपणे सुरू राहतील. मास्क, शारीरिक अंतर आणि सुरक्षा उपकरणांचा वापर अनिवार्य राहील.

इतर सर्व व्यवसाय व दुकानेः अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारची दुकानेही नियमितपणे उघडता येतील. अत्यावश्यक सेवेच्या दुकानांप्रमाणेच याही दुकानांना मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर आणि निर्देशांचे पालन करावे लागेल.

मॉल्स/चित्रपटगृहे/नाटयगृहेः औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे नियमितपणे उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन थाळीः महापालिका क्षेत्रातील रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळीही नियमितपणे उघडता येतील. मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर आदी बाबींचे पालन करावे लागेल.

सार्वजनिक ठिकाणे/क्रीडांगणे, मोकळयाजागा, उद्याने/बगीचे, मॉर्निंग वॉक व सायकलिंगलाही परवानगी देण्यात आली आहे.

खासगी कार्यालयेः सरकारच्या ४ जूनच्या आदेशानुसार सर्व आस्थापना जसे, खाजगी बँका, विमा, औषध कंपनी, सुक्ष्म वित्तसंस्था व गैर-बँकिंग वित्त-संस्था इत्यादी कार्यालये नियमितपणे कार्यालयीन वेळेपर्यंत १०० टक्के क्षमतेने सुरु राहतील.

कार्यालयीन उपस्थितीः शासकीय/ निमशासकीय/ खाजगी आस्थापना नियमितपणे कार्यालयीन वेळेपर्यंत १०० टक्के क्षमतेने सुरु राहतील.

  • क्रीडा, चित्रीकरण, विवाह समारंभ, अंत्यविधी, स्नेहसंमेलने, सामाजिक, सांस्कृतिक, करमणुकीचे कार्यक्रम सभा / निवडणुका नियमितपणे घेण्यास परवानगी राहील.
  • बांधकाम, कृषी संबंधित बाबी, ई-कॉमर्स वस्तू व सेवा नियमितपणे सुरू राहतील. औरंगाबाद महापालिका क्षेत्रात जमावबंदी किंवा संचारबंदी लागू राहणार नाही.
  • जीम/ सलुन/ ब्युटी पार्लर / स्पा/ वेलनेस सेंटर नियमित सुरू करता येतील.
  • सार्वजनिक बस वाहतूक पूर्ण आसन क्षमतेने प्रवास करण्यास परवानगी राहिल. परंतु प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्यास मनाई राहील.

आंतर जिल्हा प्रवासी वाहतूक (खाजगी कार, टॅक्सी, बस) व रेल्वेने   पूर्ण आसन क्षमतेने प्रवास करण्यास परवानगी राहील. परंतु प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्यास मनाई राहील.  तथापि जर प्रवासी लेवल ५ मधील भागातून अथवा जिल्हामार्गे प्रवास करीत असल्यास अशा प्रवाशांना ई-पास आवश्यक राहील.

उपरोक्त सर्व बाबींसाठी कोरोना अनुकूल वर्तन अनिवार्य आहे.

निर्बंध शिथिलतेबरोबरच अटीही अशाः

  • सर्व उदयोग, व्यवसाय व खाजगी आस्थापना व त्यांचे कर्मचा-यांना निगेटीव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहील. (वैधता १५ दिवसांकरिता) निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवालाशिवाय दुकान/व्यवसाय सुरु करता येणार नाही.
  • या नियमांचे उल्लंघन केल्यास कोराना महामारीची आपत्ती जोपर्यंत अस्तित्वात आहे तो पर्यंत संबंधित दुकान/आस्थापना बंद ठेवण्यात येईल, तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित आदेशाप्रमाणे दंड आकारण्यात येईल.
  • या निर्देशांचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात (नागरी भागात) आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका औरंगाबाद यांची राहिल. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी इंसिडेंट कमांडर तथा जिल्हाधिकारी/तहसिलदार, औरंगाबाद यांची राहील.
  • सदरचे आदेश आवश्यकतेनुसार रद्द किंवा सुधारित करू शकतील, असे जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा