राज्यातील निर्बंध हटवल्याच्या नुसत्या अफवाच!, वडेट्टीवारांच्या घोषणेनंतर सरकारचे स्पष्टीकरण

0
27
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई: कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात  काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत, असा खुलासा राज्य सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.

 ‘ब्रेक दि चेन’ मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात  या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासननिर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील.

अशारितीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून  पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल. तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल.

वडेट्टीवारांनी केली होती अनलॉकची घोषणा: राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध पाच टप्प्यांत शिथील होणार आहेत. पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांतील निर्बंध पूर्णपणे उठवले जाणार आहेत. करोना संसर्गाचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती. पहिल्या टप्प्यात अनलॉक होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, नागपूर, औरंगाबाद, चंद्रपूर, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नांदेड, नाशिक, परभणी, जालना, लातूर, यवतमाळ, वर्धा, वाशिम, जळगावचा समावेश असल्याचे वडेट्टीवार म्हणाले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा