औरंगाबादेत वाढती रुग्णसंख्या आणि अपुऱ्या बेड्सचे संकट, केवळ २३८ व्हेंटिलेटरच उपलब्ध

0
191
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबाद शहरात सध्या कोरोना रुग्णांना आणि नातेवाईकांना बेड मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागतेय. शहरात एका दिवसात हजाराहून अधिक रुग्ण सापडत असल्यामुळे हे संकट अधिक गडद झाले आहे. इतकेच नाही तर वेळेवर उपचार मिळत नसल्याने मृत्यूदरही वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. शहरात सध्या केवळ २३८ व्हेटिंलेटर उपलब्ध आहेत.

औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना आणि कोरोना रुग्णांना सध्या उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये कुठे जागा आहे का? याची शोधाशोध करावी लागत आहे. औरंगाबादेत खाजगी रुग्णालये फुल्ल झाली आहेत, तर सरकारी रुग्णालयांत शोधूनही एखादा बेड सापडत नाही. त्यामुळे अनेकांना घरीच उपचार घेण्यासाठी ‘होम आयसोलेशन’चा पर्याय स्वीकारावा लागत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातील कोरोना संसर्गाचा धोका किती वाढत चालला आहे, हे दिसून येऊ लागले आहे. रुग्णांची वाढणारी संख्या, हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणारे बेड आणि कोविड केअर सेंटरची कमतरता या सगळ्यांमुळे महानगरपालिका प्रशासनही हतबल झाल्याचे दिसून येत आहे. आता त्यातून मार्ग काढण्यासाठी महानगरपालिकेची धावाधाव सुरू  झाली आहे.

औरंगाबादेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच मृत्युदरही वाढत चालल्याची. बुधवारी एकाच दिवसात १७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे भीती अधिक वाढली आहे. कोरोनाबाधितांचे ट्रेसिंग, टेस्टिंग आणि उपचार होत नसल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे केंद्रीय पथकानेही औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात होत असलेल्या कोरोनाबाधितांच्या मृत्यूबद्दल चिंता व्यक्त केली असून डेथ ऑडिट करण्याची सूचनाही केली आहे.

औरंगाबाद शहरातील सरकारी आणि खाजगी दवाखान्यात मिळून केवळ २ हजार ९९७ बेड आहेत. त्यापैकी १ हजार ५११ आयसीयू बेड्स आहेत. सध्या केवळ २३८ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. त्यामुळे अचानक रुग्णाची तब्येत खालावली तर उपचार कुठे करायचे, या भीतीने औरंगाबादकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालल्यामुळे एकीकडे कोविड केअर सेंटर कमी पडत आहेत. दुसरीकडे ज्या रुग्णाला तातडीने उपचारासाठी गरज भासते आहे, त्यांना मात्र कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाही, नातेवाईकांना  बेड्सचा शोध घेत रुग्णालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

औरंगाबादेत उद्भवलेल्या परिस्थितीतीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. बेड आहेत, ऑक्सीजनही उपलब्ध आहे असेही सांगितले जाते. पण प्रत्यक्षात रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना बेड्स सापडतच नाहीत, अशी एकंदर परिस्थिती आहे.

 कोरोना महामारीच्या संकटाला तोंड देत असलेल्या औरंगाबादेत गेल्या वर्षभरात कोरोनासह महामारीवरील उपचाराच्या पायाभूत सुविधा वाढवल्या जातील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात  सप्टेंबर- ऑक्टोंबर २०२० पर्यंत जेवढ्या उपचार सुविधा होत्या, तेवढ्यात उपचार सुविधा आज आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि अपुऱ्या उपचार सुविधा लक्षात घेता औरंगाबादकरांनी आता बेफिकीरी सोडून स्वतःची काळजी स्वतःच घेणे हाच कोरोना महामारीतून वाचण्याचा सगळ्यात सुरक्षित आणि सोयीचा मार्ग दिसू लागला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा