औरंगाबादेत लॉकडाऊनची अफवाच, जिल्हा प्रशासन म्हणते विश्वास ठेवू नका!

0
552
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबाद शहराला पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने विळखा घातला आहे. मागील काही दिवसांपासून दररोज तीनशेपेक्षा अधिक बाधित रुग्ण निघत असून शुक्रवारी जिल्ह्यात तब्बल ४५७ रूग्ण निघाल्याने आरोग्य यंत्रणेला हादरा बसला आहे. त्यापार्श्‍वभूमीवर औरंगाबादेत सोमवारपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आल्याच्या अफवा काही वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी दिल्यामुळे औरंगाबादकरांची तारांबळ उडाली. या अफवांमुळे बाजारपेठेतही खरेदीसाठी झुंबड उडाली होती. मात्र लॉकडाऊनचा कोणताही निर्णय झाला नसून रविवारी आढावा बैठकीत सर्व परिस्थिती विचारात घेतल्यानंतरच लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी सुनील  चव्हाण यांनी दिले आहे. अधिकृत निर्णयाआधीच लॉकडाऊनची अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फेब्रुवारी महिन्यातील तिसर्‍या आठवड्यापासून औरंगाबाद शहरात कोरोना रूग्णांची वाढ झपाट्याने होऊ लागली आहे. त्यामुळे शहरात पुन्हा कोरोना संसर्गाच विळखा घट्ट होत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून नागरिकांना कोरोनोच नियम पाळण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र शहरात नागरिक नियम पाळताना दिसून येत नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी पसरू लागला आहे. मागील १५ दिवसात कोरोना बाधितरुग्णांचा आकडा तीन हजारापेक्षा अधिक झाला आहे. मार्चच्या पहिल्या तारखेला बाधित रुग्ण २९९ इतके होते. 2 मार्चला ३०७, ३मार्चला ३३९, ४ मार्चला ३५१ आणि ५ मार्चला ४५९ या प्रमाणे बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

अफवेमुळे बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबडः सोमवारपासून कडक लॉकडाऊन घेतले जाणार असल्याच्या अफवेने शनिवारी शहरवासीयांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या अफवेमुळे नागरिकांनी आवश्यक किराणा व इतर साहित्याचा साठा करण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी केल्याचे दिसून आले. आठ दिवस पुरेल इतके अन्नधान्य व आवश्यक साठा खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल दिसून आला. या आधी झालेल्या लॉकडाऊनच्या अनुभवामुळे यावेळी नागरिकांमध्ये साहित्य साठवणुकीबाबत अधिक खबरदारी घेतली जात असल्याचेही यातून दिसून आले.

अफवांवर विश्‍वास ठेवू नकाः जिल्हा प्रशासन- जिल्ह्यात लॉकडाऊन बद्दल कोणताही निर्णय झालेला नसून सर्व अधिकार्‍यांशी चर्चा करून परिस्थितीनुसार निर्णय घेऊन निर्बंध वाढवण्यात येतील. सर्व गोष्टीवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी केले. लॉकडाऊनबाबत रविवारी,७ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांच्या ’देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा प्रशासक, जि.प. सीईओ आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक यांची तातडीची संयुक्त बैठकीत चर्चेअंती लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार असल्याचे परिपत्रकत म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा