भुकेल्यांना दिलासाः आता सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत शिवभोजन थाळी मिळणार पार्सल!

0
172
संग्रहित छायाचित्र.

मुंबई:  कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा केली आहे. आता ही थाळी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत पार्सल मिळणार आहे. राज्य सरकारने तशा सूचना आज जारी केल्या आहेत.

ब्रेक द चेनची मोहीम राज्यभर सुरू झाली आहे. या कालावधीत गरीब व गरजू लोकांना जेवणाअभावी हाल-अपेष्टा सहन कराव्या लागू नयेत यासाठी शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना नि:शुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आता ही थाळी मिळण्याची वेळही वाढवण्यात आली आहे. आता सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत शिवभोजन थाळी पार्सल मिळणार आहे.

१५ एप्रिलपासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात यावी. या कालावधीत संपूर्ण राज्यात दररोज दोन लाख शिवभोजन थाळी मोफत दिली जाणार आहे. त्यासाठी आज मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

शिवभोजन थाळीच्या राज्याच्या इष्टांकामध्ये वाढ करण्यात आली असल्याने सद्यस्थितीत सुरु असलेल्या शिवभोजन केंद्रांच्या प्रतिदिन इष्टांकामध्ये दीड पट वाढ करण्यात येत आहे. (उदा. शिवभोजन केंद्राचा इष्टांक १०० थाळी असल्यास पुढील एक महिन्यासाठी त्याचा इष्टांक १५० एवढा राहील.)  एक महिन्यानंतर सदर ईष्टांक पूर्वरत होईल.

शिवभोजन केंद्रावर निर्जंतुकीकरणाच्या नियमांचे पालन करुन शिवभोजन केंद्रातून सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत या कालावधीत पार्सल सुविधेद्वारे ग्राहकांना शिवभोजन उपलब्ध करुन देण्यात यावे.

या वेळेत कोणताही लाभार्थी शिवभोजनाविना परत जाणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. कोणत्याही सबळ कारणांशिवाय शिवभोजन केंद्र बंद राहणार नाही याची दक्षता घ्यावी.संपूर्ण शिवभोजन केंद्राचे दररोज निर्जंतुकीकरण करावे.

शिवभोजन केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तसेच पार्सल घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाने मुखपट्टी (मास्क) वापरणे बंधनकारक राहील. शिवभोजन केंद्रावर सामाजिक अंतराच्या नियमांचे कसोशीने पालन करावे.शिवभोजन तयार करणाऱ्या तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुवावेत.

खोट्या नावाने तसेच तीच-ती लाभार्थ्यांची छायाचित्रे शिवभोजन ॲपवर टाकली जाणार नाहीत याची खबरदारी शिवभोजन केंद्र चालकाने घ्यावी. सर्व शिवभोजन केंद्रांची पुरवठा यंत्रणेद्वारे या महिन्यात किमान एक वेळ काटेकोर तपासणी करण्यात यावी, असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा