रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीच्या एका डोसची भारतातील किंमत तब्बल 996 रुपयांच्या घरात

0
130
प्रातिनिधिक छायाचित्र.

हैदराबादः रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन यांनी ज्या स्पुटनिक व्ही लसीची तुलना एके-47 या खतरनाक गनशी केली त्या लसीची भारतातील किंमत अखेर जाहीर करण्यात आली आहे. रशियाहून आयात करण्यात आलेल्या स्पुटनिक व्ही लसीच्या एका डोससाठी जवळपास एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत. ही किंमत भारतात तयार करण्यात आलेल्या कोविशिल्डआणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लसींपेक्षा जास्त आहे.
हैदराबादच्या डॉ. रेड्डीज लॅबॉरेटरीने दिलेल्या माहितीनुसार, रशियाहून आयात करण्यात आलेल्या स्पुटनिक व्ही या लसीच्या एका डोसची मूळ किंमत 948 रुपये आहे.लसीच्या प्रत्येक डोससाठी 5 टक्के जीएसटी म्हणजेच 47.40 रुपये आकारले जाणार आहेत. त्यामुळे स्पुटनिक व्ही ही लस घेणा-यांना प्रत्येक डोससाठी 995 रुपये 40 पैसे मोजावे लागणार आहेत. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या भारतात तयार झालेल्या लसींप्रमाणेच स्पुटनिक व्ही लसीचेही दोन डोस घ्यावे लागणार आहेत. म्हणजेच ही लस घेणा-यांना दोन्ही डोसचे मिळून 1 हजार 990 रुपये 80 पैसे मोजावे लागणार आहेत.
डॉ. रेड्डीज लॅबॉरेटरी भारतात स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती करणार आहे. भारतात या लसीची निर्मिती झाल्यानंतर मात्र तिची किंमत रशियाहून आयात करण्यात आलेल्या स्पुटनिक व्ही लसीपेक्षा थोडी कमी असू शकते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा