राज्यातही मिळणार रशियाची स्पुटनिक व्ही लस, पण केव्हा आणि कशी? आरोग्यमंत्री म्हणाले…

0
89
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जात असतानाच भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या भारतात तयार झालेल्या कोरोना प्रतिबंधक लसींबरोबरच देशात रशियाची स्पुटनिक व्ही ही लसही दाखल झाली आहे. त्यामुळे लसीचे आता तीन पर्याय उपलब्ध झाले असले तरी स्पुटनिक व्ही लस केव्हा मिळणार? आणि कोणाला व कशी मिळणार? असे प्रश्न चर्चिले जात आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी याबाबतचा खुलासा केला.

पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती, उपाययोजना आणि लसींची उपलब्धता याबाबत सविस्तर माहिती दिली. लसीकरणाला वेग देण्यासाठी लसींचा पुरवठा आवश्यक असून आज राज्यात कोविशिल्डचे ९ लाख डोस प्राप्त झाले आहेत. त्याद्वारे ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जाईल. तर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी सुमारे १८ लाख डोसेससाठी खरेदी आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात ४५ वर्षांवरील सुमारे १ कोटी ६५ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कालपर्यंत राज्यात या वयोगटाच्या लसीकरणासाठी केवळ २५ हजार डोस शिल्लक होते. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद होते. आज राज्याला ९ लाख डोस मिळाले आहेत. त्यातून ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाईल. ४५ वर्षांवरील सुमारे ३.५ कोटी लोकसंख्येपैकी ४५ टक्के नागरिकांना लसीकरण झाले आहे, असे टोपे म्हणाले.

१ मेपासून १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणास सुरूवात झाली. आतापर्यंत या वयोगटातील सुमारे १ लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यांच्या लसीकरणाला गती येण्यासाठी कोविशिल्ड लसीचे १३ लाख ५८ हजार तर कोवॅक्सिन लसीच्या ४ लाख ८९ हजार असे एकूण १८ लाखांहून अधिक डोसेस खरेदी करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असे टोपे म्हणाले.

रशियाची स्पुटनिक व्ही ही कोरोना प्रतिबंधक लसही भारतात आली आहे. स्पुटनिक व्ही लसीच्या दराबाबत राज्य सरकारची चर्चा सुरू आहे. एकदा या लसीचे दर निश्चित झाले की राज्यातही स्पुटनिक व्ही लसीचे डोस मागवण्यात येतील, असेही टोपे म्हणाले.

१५ जिल्ह्यांत रुग्णसंख्या घटलीः राज्यातील सुमारे १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून अन्य काही जिल्ह्यांमध्ये त्यात वाढही होत आहे.  राज्यातील नांदेड, धुळे, मुंबई, भंडारा, ठाणे, नाशिक, लातूर, नंदूरबार, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, रायगड, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमधील दैनंदिन नवीन रुग्णसंख्या कमी झाली आहे. महाराष्ट्राचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशाच्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा