औरंगाबादः ग्रामीण भागातील पाचवी ते नववीचे वर्ग २० मार्चपर्यंत बंद, शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के

0
41
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबाद: कोरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे औरंगाबाद जिल्हयाच्या ग्रामीण भागातील इयता १० वी आणि इयत्ता १२ वीचे वर्ग वगळता इयत्ता पाचवी ते नववी आणि आकरावीचे वर्ग २० मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी घेतला आहे. या काळात सर्व व्यवस्थापन आणि माध्यमाच्या शाळा बंद राहतील.

पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग पुर्वीप्रमाणे ऑनलाईन व दुरस्थ पध्दतीने सुरु ठेवण्यात येत आहे. इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वीचे वर्ग नियमित सुरु राहतील. मात्र विद्यार्थ्यांची दररोज थर्मल गन व ऑक्सीमीटरद्वारे तपासणी करुन त्याची विद्यार्थीनिहाय नोंद ठेवण्याचे निर्देश सर्व शाळांना देण्यात आले आहेत. सर्व शिक्षकांनी दर आठवडयाला आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहील. जर एखाद्या शाळेत, महाविद्यालयात शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी अथवा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास सदर शाळा, महाविद्यालय किमान चार दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल. सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी व अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत शाळा सुरु करण्यात येऊ नयेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

हेही वाचाः औरंगाबाद जिल्ह्यात ३५७ नवे कोरोनाबाधित रुग्ण, एकाचा मृत्यू

इतर शिक्षकांची ५० टक्के उपस्थितीः इयत्ता १० वी व इयत्ता १२ वीच्या वर्गावरील अध्यापन करणारे शिक्षक वगळून इतर वर्गावरील शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती अनिवार्य राहील. इयत्ता १० वी व इयत्ता १२ वीचे वर्ग नियमित सुरु असल्याने संदर्भीय शासन परिपत्रकामधील सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य राहील. १०० टक्के शिक्षकांच्या उपस्थितीचा अनावश्यक आग्रह शाळा व्यवस्थापनाने करु नये. १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मास्क परिधान केल्याशिवाय शाळेत प्रवेश देण्यात येऊ नये. तसेच हात धुणे, सामाजिक अंतर राखणे आणि शाळा इमारतींचे निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

गुन्हे नोंदवणारः या आदेशाचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्‍यास संबंधितावर आपत्‍ती व्‍यवस्‍थापन  कायदा २००५ चे कलम ५१ व ५६ अन्‍वये  कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही डॉ.गव्हाणे यांनी आदेशात नमूद केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा