‘ब्रेक दि चेन’: व्यापारी, व्यावसायिकांना मिळणार दोन दिवसांत निर्बंधातून दिलासा?

0
798

मुंबईः राज्यातील कोरोनाचा कहर रोखण्यासाठी ब्रेक दि चेन अंतर्गत लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे संतप्त झालेल्या व्यापारी, व्यावसायिकांना येत्या दोन दिवसांतून निर्बंधातून काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

ब्रेक दि चेन अंतर्गत लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे राज्यातील बाजारपेठा बंद आहेत. फक्त किराणा दुकाने, फळे- भाजीपाला, डेअरी अशी अत्यावश्यक सेवेतील दुकानेच सुरू आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून निर्बंधांतून सूट देण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

 कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी आम्ही सरकारच्या हातात हात घालून सहकार्य करू. परंतु आताच्या निर्बंधांतून शिथिलता द्या. व्यापाऱ्यांचे कामही सुरू राहील आणि कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीच्या नियमांचे काटेकोरपणे पालनही होईल, अशा उपाययोजना करा, अशी मागणी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

 व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून उपाययोजना केल्या जातील. कोणत्याही गोष्टी बंद करण्याची आमची भूमिका नाही. कुणाच्याही रोजीरोटीवर निर्बंध आणावेत किंवा लॉकडाऊन करावे अशी इच्छा नव्हती. लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे पाऊल कोरोनाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कुणाच्याही विरोधात नाही. लोकांचे जीव वाचवायचे आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मला सहकार्य हवे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. येत्या दोन दिवसांत काही निर्बंध शिथील करण्याचे किंवा त्यात सुटसुटीतपणा आणण्याचे संकेतही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. खरे तर दुकाने चोवीस तास उघडी ठेवा असे आवाहन मी यापूर्वीच केले होते. जेणेकरून गर्दी कमी होईल. आताही दुकाने बंद करणे हा हेतू नाही, तर गर्दी टाळणे हा हेतू आहे. यापूर्वी आपण सामाजिक अंतराचे चौकोन आखले होते. त्यातून परिश्रमाने, मेहनतीने पहिल्या लाटेवर मात केली होती. पण आता परिस्थितीच विचित्र झाली आहे, असे ठाकरे म्हणाले.

चिथावणीला बळी पडू नकाः नक्कीच या संकटातून बाहेर पडू. पण गेल्यावेळी जी चूक केली, ती पुन्हा करू नये. कोरोना पूर्ण जात नाही. तोपर्यंत शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे. आपण सर्व एक आहोत. शांतपणे, कुठलाही धोका न पत्करता कोणत्या उपाययोजना करता येतील, याचा विचार करू. रस्त्यावर उतरण्याची भाषा करू नका. हा लढा सरकारशी नाही. विषाणूशी लढा आहे. तुम्ही महाराष्ट्राचे भूमीपूत्र आहात. तुमचे नुकसान होऊ देणार नाही. कुणाच्याही चिथावणीला बळी पडू नका. संकटाच्या काळातच शत्रू आणि मित्र कोण यांची ओळख होते. हे समजून घ्या. न डगमगता यातून बाहेर पडायचे आहे. कोरोनावर मात करायची आहे, हे लक्षात घ्या, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 व्यापाऱ्यांचे आंदोलन मागेः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर व्यापाऱ्यांनी गुरूवारी पुकारलेले आंदोलन मागे घेतले आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत सकारात्मक घोषणा करण्याचे आश्वासन व्यापाऱ्यांना दिले आहे. त्यानंतर व्यापारी महासंघाने आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. येत्या दोन दिवसांत व्यापार, व्यवसाय क्षेत्राला काहीसा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा