हिमायतनगरमधील दोन जणांना ओमीक्रॉनची बाधा, नांदेड जिल्ह्यात खळबळ

0
161
प्रातिनिधिक छायाचित्र.

नांदेडः कोरोनाचा ओमीक्रॉन विषाणू मराठवाड्यात हातपाय पसरू लागला असून आता नांदेड जिल्ह्यातही ओमीक्रॉनची बाधा झालेले दोन रूग्ण आढळून आले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून हिमायतनगर येथे आलेल्या तीनपैकी दोन जणांचे ओमीक्रॉन चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या या रूग्णांवर हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 दक्षिण आफ्रिकेतून हिमायतनगर येथे आलेल्या तीन प्रवाशांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे नांदेडच्या आरोग्य यंत्रणेची झोप उडाली होती. या तीनही जणांचे स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठवण्यात आले होते. त्यांचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून या तिघांपैकी दोन जण ओमीक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

जगभरात ओमीक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढू लागल्यानंतर परदेशातून देशात आलेल्या प्रवाशांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत ३०२ जण परदेशातून आले आहेत. त्यापैकी दक्षिण आफ्रिकेतून हिमायतनगर येथे आलेल्या तीन जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. आता या तीन रुग्णांपैकी दोन जणांना ओमीक्रॉनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या या दोन्ही रूग्णांवर हदगवाच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मराठवाड्यात आतापर्यंत औरंगाबादेत दोन, लातूरमध्ये एक, उस्मानाबादेत ५ नांदेडमध्ये २ असे एकूण १० ओमीक्रॉन पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील आरोग्य यंत्रणेची झोप उडाली असून खबरदारीच्या उपाययोजना युद्ध पातळीवर हाती घेतल्या जात आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा