१२ ते १४ वयोगटातील मुलांनाही देणार कोरोनाची लस, १६ मार्चपासून होणार लसीकरण

0
44
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः कोरोना विषाणूच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी केंद्र सरकारने सोमवारी मोठा निर्णय घेतला. देशातील १२ ते १४ वयोगटातील मुलांनाही कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार असून १६ मार्चपासून या मुलांचे लसीकरण सुरू होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे अनेक राज्यांत शाळा उघडण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुलांमध्ये कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

बायोलॉजिकल इव्हान्स कंपनीची कॉर्बिव्हॅक्स ही लस १२ ते १४ वयोगटातील मुलांना दिली जाणार आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने ६० वर्षांवरील नागरिकांना प्रिकॉशनरी डोस देण्यासाठी को-मॉर्बिडीटीची अटही काढून टाकली आहे. त्यामुळे आता ६० वर्षांवरील सर्व नागरिकांना बुस्टर डोस म्हणजेच प्रिकॉशनरी डोस घेता येणार आहे.

यापूर्वी या वर्षाच्या प्रारंभीच १५ ते १८ वर्षांच्या मुलांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १५ जानेवारीपासून या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरूही करण्यात आले. त्या दरम्यान या वयोगटातील मुलांना मोठ्या संख्येने लस घेतली. त्यासाठी मुलांनी कोविन ऍपवर स्वतःची नोंदणीही केली होती. १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरण नोंदणीसाठी कोविन ऍपवर स्वतंत्र स्लॉट सुरू करण्यात आला होता.

या वर्षाच्या प्रारंभीच फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा एक अतिरिक्त डोस देण्यात आला होता. आता १२ ते १४ वयोगटातील मुलांनाही कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे कोरोनापासून मुलांचा बचाव करण्याच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल मानले जात आहे.

मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग फैलावण्याचा धोका लक्षात घेऊन मागील दोन वर्षांपासून देशभरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी कमी झाल्यामुळे देशातील अनेक राज्यांत शाळा पुन्हा उघडण्यात आल्या आहेत. त्यामुळे १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे. भारताच्या आधी युरोपातील अनेक देशांनी, अमेरिका, यूएई आणि न्यूझीलंडमध्ये मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

कधी जन्मलेल्यांना मिळणार लस?: बायोलॉजिकल इव्हान्स कंपनीच्या कॉर्बिव्हॅक्स या कोरोनावरील लसीच्या आपत्कालीन वापराला भारताच्या औषधे महानियंत्रकांनी फेब्रुवारीमध्ये काही अटींच्या अधीन राहून मंजुरी दिली होती. १२ ते १८ वयोगटातील मुलांना देण्यासाठी या लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली होती. केंद्राच्या या निर्णयानुसार २००८, २००९ आणि २०१० मध्ये जन्मलेल्या मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा