राज्यात शुक्रवार ते सोमवारपर्यंत कडक लॉकडाऊन, ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध!

0
819

मुंबईः राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूच्या संसर्गाने अक्षरशः थैमान घातल्यामुळे संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कठोर निर्बंध लागू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शुक्रवारी रात्री ८ वाजेपासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात कडक  वीक एंड लॉकडाऊन असणार आहे. शनिवारी व रविवारी केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू राहणार असून हे निर्बंध सोमवार, ५ एप्रिलपासून रात्री ८ वाजल्यापासून लागू राहणार आहेत. याबाबतच्या गाइड लाइन्स जारी केल्या जाणार आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वेगाने कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत असून रुग्णांचे हाल टाळण्यासाठी आणि कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार लॉकडाऊन लागू करण्यसंदर्भात चाचपणी करत होते. उद्योग, व्यवसाय, राजकारण अशा विविध घटकांशी चर्चा केल्यानंतर आज दुपारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीत राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शुक्रवारी रात्री ८ वाजेपासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत वीक एंड लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

हेही वाचाः ब्रेक दि चेनः राज्यातील मिनी लॉकडाऊन, संचारबंदीच्या काळात अशी असेल नियमावली…

 राज्यात उद्या सोमवारपासून रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करणार आहे. दिवसा कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू असेल. येत्या ३० एप्रिलपर्यंत हे कठोर निर्बंध लागू असतील. वीक एंड लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच शनिवारी- रविवारी रेस्टॉरंट्स, हॉटेल्सना पार्सल आणि टेक अवे सुविधा देण्याची परवानगी असेल. कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करावे लागेल. याबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना आजच जारी करण्यात येणार येणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. उद्या, सोमवारी रात्री ८ वाजेपासून ही नियमावली लागू होईल. रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात संचारबंदी असेल. इतरवेळी जमावबंदी आदेश लागू असतील, असे मलिक म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याचे मलिक यांनी सांगितले.

काय बंद आणि काय सुरू राहणार?:

 • सर्व मॉल्स, रेस्टॉरंट्स, बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • फक्त होम डिलिव्हरी आणि अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील.
 • शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.
 • उद्योग संपूर्ण क्षमतेने सुरू राहणार असून कामगारांवर बंधने नसतील.
 • कामगारांना राहण्याची व्यवस्था असलेली बांधकामे सुरू राहतील.
 • मंडईवर निर्बंध नसतील परंतु गर्दी कमी करण्यासाठी नियमावली असेल.
 • शुक्रवारी रात्री ८ वाजेपासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन असेल.
 • लॉकडाऊनच्या काळात चौपाट्या, गार्डन, धार्मिक स्थळे बंद राहतील.
 • धार्मिक स्थळी फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्याची मुभा राहील.
 • सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम बंद राहतील.
 • सार्वजनिक व खासगी वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नसतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा