कोरोना काळात सर्वात वाईट कामगिरी कोणत्या नेत्याची?, मोदींना मिळाली तब्बल ९० टक्के मते!

0
821
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जगात हाहाकार उडाला असून भारतातील कोरोना व्यवस्थापनावर जगभरातील मीडियातून टिकेची झोड उठली आहे. मोदी सरकारच्या ढिसाळ कामगिरीवर टिकास्त्र सोडले जात असतानाच द कॉन्व्हर्झेशन  या न्यूज वेबसाईटने ट्विटर या सोशल मीडियावर घेतलेल्या पोलमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे कोरोना काळात सर्वात वाईट कामगिरी करणारे जागतिक नेते ठरले आहेत. कोरोना काळात सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण? असा प्रश्न या पोलमध्ये विचारण्यात आला होता. त्यात मोदींना तब्बल ९० टक्के मते मिळाली आहे.

द कॉन्व्हर्झेशने कोरोना काळातील त्या त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष किंवा प्रधानमंत्र्यांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यासाठी ट्विटरवर पोल घेतला. या पोलमध्ये सहभागी झालेल्या ७५ हजार ४५० मतदात्यांपैकी तब्बल ९० टक्के मते भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दिली आहेत. म्हणजेच मोदी हे कोरोना काळात सर्वात वाईट कामगिरी करणारे नेते ठरले आहेत. मोदींच्या खालोखाल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ४.९ टक्के मते, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो यांना ३.६ टक्के मते आणि मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष ऍन्ड्रेस मॅन्युअल लोपेझ ओब्रेडोर यांना १.३ टक्के मते मिळाली आहेत.

भारतातील कोरोना व्यवस्थापनाचे इंडियाना युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक सुमित गांगुली यांनी विश्लेषण केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एप्रिल महिन्यातील विधानसभा निवडणुकीसाठीच्या निवडणूक प्रचारसभा, कुंभमेळा आणि भारतातील लसीकरणाची संथगती यावर बोट ठेवले आहे.

भारत हे कोरोनाच्या जागतिक महामारीचे नवे केंद्र ठरले आहे. मेमध्ये भारतात दरदिवशी ४ लाखांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. ही आकडेवारीही भारतातील कोरोनाची गंभीर स्थिती स्पष्ट करण्यास अपुरी ठरते. रुग्णालयात ऑक्सीजन आणि रेमडेसिवीरसारखी जीवरक्षक औषधे नसल्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण मरत आहेत. ज्या रुग्णालयांत बेड्स उपलब्ध नाहीत, तेथून रूग्णांना हाकलून दिले जात आहे. देशातील या शोकांतिकेला बहुतांश भारतीय एकाच व्यक्तीला दोष देतात, ती व्यक्ती म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असे प्रो. गांगुली यांनी म्हटले आहे.

 भारताने प्रभावीपणे कोरोनावर नियंत्रण मिळवून मानवता वाचवली आहे, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जानेवारी २०२१ मध्ये जागतिक फोरमवर जाहीर केले होते. कोरोना महामारी आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर पोहोचली आहे, अशी घोषणा मार्चमध्ये त्यांच्या आरोग्यमंत्र्यांनी केली. वस्तुतः कोरोना भारत आणि जगभरात अधिक प्रबळ होत चालला होता. परंतु या सरकारने कोणतीही तयारी केली नाही, असे प्रो. गांगुली यांनी म्हटले आहे.

 गेल्या वर्षी मोदींनी आपल्या यशाच्या बढाया मारत भारत हा जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश असल्याचे सांगितले. शेजारी राष्ट्रांना १० दशलक्ष लसीचे डोस पाठवले. परंतु मेपर्यंत भारतातच केवळ १.३ कोटी लोकांचेच लसीकरण होऊ शकले, याकडेही प्रो. गांगुली यांनी लक्ष वेधले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा