विनामास्क नागरिकांना चौकाचौकात आकारणार दंड, वाहनधारकांवरही कारवाईचा बडगा

0
79
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबाद: कोविड संसर्गचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व ओमीक्रॉन विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून आता विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना चौकाचौकात दंड आकारला जाणार आहे. विनामास्क वाहनधारक आढळल्यास त्याच्या वाहनाचा फोटो आरटीओकडे पाठवण्यात येणार असून त्यानंतर अशा वाहनधारकांवर आरटीओमार्फत कारवाई केली जाणार आहे.

जिल्हा कोरोना टास्क फोर्सची बैठक सोमवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ओमीक्रॉन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा टास्क फोर्स समितीने अनेक निर्णय घेतलेले आहेत. या निर्णयांची संबंधित यंत्रणेने काटेकोर अंमलबजावणी करून ओमीक्रोन विषाणू संसर्गापासून आपल्या जिल्ह्याचे संरक्षण करण्याचे निर्देश चव्हाण यांनी या बैठकीत दिले.

चला उद्योजक बनाः  एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

शहरातील चौकाचौकात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना दंड करणे,  प्रत्येक तालुका आरोग्य अधिकारी यांच्या समन्वयाने खासगी रुग्णालयात ओपीडी बरोबरच आरटीपीसीआर तपासणी सक्तीची करावी, कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त नागरिकांचे गृह विलगीकरण बंद करुन संस्थात्मक विलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या. लसीकरण कामकाजात अडथळा आणणाऱ्या शिवाजीनगर परिसरातील नीलकमल फर्निचर सील करण्याचे आदेशही चव्हाण यांनी दिले.

शहरातील चौकाचौकात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या संदेशाचे टी शर्ट व कॅप घातलेल्या प्रशासनाकडून नियुक्त कर्मचाऱ्यांकडून लसीकरण आणि मास्क घालण्याबाबत संदेश दिला जाणार असून संबधित कर्मचाऱ्याला विनामास्क वाहनधारक दिसल्यास संबंधित गाडीचा फोटो परिवहन विभगाकडे पाठवला जाणार आहे. यानंतर अशा वाहन धारकास परिवहन विभागामार्फत नोटीस दिली जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

घाटीत होणार जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळाः ओमीक्रॉन संसर्ग तपासणीमध्ये महत्वाच्या ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ तपासणीसाठी प्रयोगशाळेचा प्रस्ताव तयार करून शासनास पाठविण्याचे निर्देश घाटी प्रशासनाला दिले. डिसेंबर माहिन्याअखेर मोठे उत्सव, लग्न समारंभ, आणि अनावश्यक गर्दीच्या कार्यक्रमाचे आयोजन न करण्याचे निर्देशही चव्हाण यांनी दिले. जिल्हयात कोरोना चाचण्या वाढवाव्यात, ज्या नागरिकांचा दुसरा डोस राहिलेला आहे त्यांनी तो तत्काळ घ्यावा, लसीकरणासाठी अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. ऑक्सीजन बेड, आणि आयसीयु बेड, यासह विशेष बेडची सुविधा सज्ज ठेवण्याबाबत आरोग्य यंत्रणेला सूचित करण्यात आले.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, पोलीस अधीक्षक निमित गोयल, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, सहआयुक्त बी.बी. नेमाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीप कुलकर्णी, मनपा आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा, जिल्हा टास्क फोर्स समितीचे सर्व सदस्य, विभागप्रमुख यांच्यासह घाटी रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महानगरपालिकेतील आरोग्य यंत्रणेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा