मोदींचा अतिआत्मविश्वास नडलाः कोरोना स्थिती हाताळणीवर आंतरराष्ट्रीय माध्यमातून टिकेची झोड

0
506

नवी दिल्लीः देशाताली कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. दररोज आढळणारे नवीन कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांचे आकडे नको असलेला जागतिक विक्रम नोंदवत असताना भारतात बिघडत चाललेल्या या परिस्थीतीवरून आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मोदी सरकारच्या कोरोना परिस्थिती हाताळणीवर टिकेची झोड उठवली आहे. मोदींचा अतिआत्मविश्वास आणि आत्मसंतुष्टी यामुळे हे सारे घडले, असा ठपका आंतरराष्ट्रीय माध्यमांनी ठेवला आहे. हिंदू नाराज होऊ नये म्हणून केलेले कुंभमेळ्याचे आयोजन, पश्चिम बंगालमध्ये हजारोंच्या संख्येने विनामास्क लोकांच्या मोदींनी घेतलेल्या प्रचारसभा अशा घटनांचे दाखले देत आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मोदींना दुसऱ्या लाटेचा खलनायक ठरवले आहे.

‘देशातील विनाशकारी कोविड १९ परिस्थिती मागे भारतीय प्रधानमंत्र्यांचा अतिआत्मविश्वास आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या आकलनाने काही निर्णय घेतले. तज्ज्ञांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या चुकांचे परिणाम आज भोगावे लागत आहेत. नरेंद्र मोदींच्या अतिआत्मविश्वासामुळे हे घडले. मोदींनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्बंध कसे ठेवावेत याचा विचार करायला हवा होता. आपण जे बोलतो ते करतो हे दाखवायला हवे होते. त्यांनी (मोदींनी) चुका मान्य करायला हव्यात आणि त्या चुका सुधारायला हव्यात. मोदींच्या ज्या विचारांमुळे विनाशकारी सार्वजनिक आरोग्य संकटाला जन्म दिला, ते त्याच विचाराने पुढे जात राहिले तर भविष्यातील इतिहासकार मोदींशी कठोरपणे न्याय करतील,’ असे द गार्डियन या ब्रिटिश दैनिकाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

भारतातील कोविड१९ च्या दुसऱ्या लाटेबाबत भारताच्या प्रतिसादात जे ब्लाइंडस्पॉट्स आहेत, ते इतर देशांसाठी इशारा आहेत. कदाचित सामाजिक व्यवहार, भारतातील आरोग्य व्यवस्था आणि धोरणात्मक निर्णयातील त्रुटी याचे संयोजन म्हणजे भारतातील दुसरी लाट आहे, असेही या विश्लेषणात म्हटले आहे.

आत्मसंतुष्टी आणि सरकारच्या चुकीच्या पावलांमुळे भारतातील कोरोना परिस्थितीचा पेच आणखी गंभीर केला आहे. कोरोना संसर्गाची परिस्थिती हाताळण्यात भारताला सातत्याने येत असलेल्या अपयशाचे जागतिक परिणाम होतील, असे अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात म्हटले आहे. पहिल्या लाटेत मीडियाने मोदींचे महिमामंडन केले. आता जागतिकस्तरावर तयार झालेली धारण चुकीची सिद्ध करण्यासाठी पीआर एजंसीजना प्रचंड मेहनत घ्यावी लागेल, असे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे.

‘या सगळ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. अनेक इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. मंत्रिमंडळातील मंत्री खुशामतखोर आहेत. कोरोनाची लाट यशस्वीपणे हाताळल्याबद्दल त्यांनी मोदींची प्रसंशा तेवढी केली. त्यानंतर चाचण्याही कमी केल्या. कोरोना गेला असे वर्तन लोक आत्मसंतुष्टतेतून करू लागले, तेच अंगाशी आले. महाराष्ट्रातील परिस्थितीही राज्यातील राजकारण्यांनी एकमेकांवर कुरघोड्यांचे राजकारण केल्याने बिघडली. कोरोनाची लाट परत आली, तेव्हा ते गाफील होते. जेव्हा खरे काही करायचे होते तेव्हा ते राजकारण करत राहिले,’ असे टाइमच्या लेखात म्हटले आहे.

२०२० मधील चुकांपासून कोणताही धडा घेण्यात आला नाही आणि नवीन चुकांचा पेटारा खोलण्यात आला. आज भारतातील लोक अत्यंत गंभीर संकटाला सामोरे जात आहेत. देश तोंडावर आपटला आहे, असे नमूद करतानाच टाइमच्या या लेखात पश्चिम बंगालमधील मोदींच्या निवडणूक प्रचारसभांवरही टिकास्त्र सोडण्यात आले आहे. प्रचारसभेत विनामास्क लोक होते. परंतु मोदी मी माझ्या जीवनात एवढी गर्दी पाहिली नाही. जिकडे नजर जाईल, तिथपर्यंत लोक आहेत, असे म्हणत होते, याकडेही या लेखात लक्ष वेधण्यात आले आहे.

भारतातील अत्यंत धोकादायक विषाणू सीमा ओलांडून विनाश घडवून आणू शकतो. सरकारच्या नाकर्तेपणामुळे परिस्थिती बिघडली. दिल्लीने आपली पाठ थोपटून घेत विषाणूवर मात केल्याची आत्मसंतुष्टी मिरवली. हे पूर्णतः चुकीचे होते, असे दि वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले आहे.

कोरोनाबाबत आत्मसंतुष्टता भारताला नडली. त्यामुळे आताची दुरवस्था ओढवली आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण खूप जास्त आहे. योग्य धोरणे राबवली असती तर हा सगळा प्रकार टाळता आला असता, असे ऑस्ट्रेलियाच्या एबीसी या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. भारतातील कोरोनाची दुसरी पहिल्या लाटेच्या तुलनेत खूपच आक्रमक आहे. हा विनाश सहजपणे रोखता आली असती, असा भक्कम विश्वास होता. जे काही चुकीचे घडले त्यामागे तीन गोष्टी आहेत. सरकारचे वर्तन, सार्वजनिक व्यवहार आणि व्हेरियंट्स, असे एसीबीने म्हटले आहे.

“देशातील विनाशकारी कोविड १९ परिस्थिती मागे भारतीय प्रधानमंत्र्यांचा अतिआत्मविश्वास आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या आकलनाने काही निर्णय घेतले. तज्ज्ञांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या चुकांचे परिणाम आज भोगावे लागत आहेत. नरेंद्र मोदींच्या अतिआत्मविश्वासामुळे हे घडले.’’

  • द गार्डियन, ब्रिटन

“कोरोना संसर्गाची परिस्थिती हाताळण्यात भारताला सातत्याने येत असलेल्या अपयशाचे जागतिक परिणाम होतील. पहिल्या लाटेत मीडियाने मोदींचे महिमामंडन केले. आता जागतिकस्तरावर तयार झालेली धारण चुकीची सिद्ध करण्यासाठी पीआर एजंसीजना प्रचंड मेहनत घ्यावी लागेल.’’

  • न्यूयॉर्क टाइम्स, अमेरिका

“भारतातील अत्यंत धोकादायक विषाणू सीमा ओलांडून विनाश घडवून आणू शकतो. सरकारच्या नाकर्तेपणामुळे परिस्थिती बिघडली. दिल्लीने आपली पाठ थोपटून घेत विषाणूवर मात केल्याची आत्मसंतुष्टी मिरवली. हे पूर्णतः चुकीचे होते.”

  • दि वॉल स्ट्रीट जर्नल,  अमेरिका

“या सगळ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. अनेक इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. मंत्रिमंडळातील मंत्री खुशामतखोर आहेत. कोरोनाची लाट यशस्वीपणे हाताळल्याबद्दल त्यांनी मोदींची प्रसंशा तेवढी केली. कोरोना गेला असे वर्तन लोक आत्मसंतुष्टतेतून करू लागले, तेच अंगाशी आले.”

  • टाइम, अमेरिका

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा