देशात १० दिवसांतच वाढले एक लाखांहून अधिक कोरोना रूग्ण, एकूण संख्या ३ लाख ९ हजार ३६०

0
29

नवी दिल्लीः देशातील कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी मंदावण्याची चिन्हे दिसेना झाली आहेत. शुक्रवारी देशभरात विक्रमी ११ हजार ७७५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. देशातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या ३ लाख ९ हजार ३६० वर पोहोचली असून आतापर्यंत ८ हजार ८८६ लोकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे एवघ्या दहा दिवसांतच देशातील रूग्णांची संख्या एक लाखांहून अधिक वाढली आहे.

देशात आजवर आढळून आलेल्या कोरोना बाधित रूग्णांपैकी १ लाख ४७ हजार १९५ रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. देशात कोरोना बाधित रूग्ण बरे होण्याचा दर ४९.४७ टक्के आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांच्या संख्येत महाराष्ट्राची आकडेवारी मोठी आहे. शुक्रवारी आढळलेल्या ३ हजार ४९३ नवीन कोरोना बाधित रग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १ लाख १ हजार १४१ झाली आहे. एकट्या मुंबईतच तब्बल ५५ हजार ४५१ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून तेथे २ हजार ४४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रापाठोपाठ आता राजधानी नवी दिल्लीतील कोरोना बाधितांची संख्याही झपाट्याने वाढत चालली आहे. शुक्रवारी दिल्लीत २ हजार १३७ कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. ही दिल्लीतील आजपर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी आहे. राष्ट्रीय राजधानीतील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ३६ हजार ८२४ झाली आहे तर आजपर्यंत १ हजार २१४ लोकांचा मृत्यू झाला आहे. राजधानीतील रूग्णवाढीचा वेग असाच कायम राहिला तर ३१ जुलैपर्यंत कोरोना बाधितांची संख्या साडेपाच लाखांपर्यंत पोहोचू शकते आणि त्यासाठी रूग्णालयात ८० अतिरिक्त बेड्सची गरज भासेल, असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीच म्हटले आहे.

कोरोना बाधितांवर जनावरांपेक्षाही वाईट उपचारः दरम्यान, दिल्लीत कोरोना बाधितांवर जनावरांपेक्षाही वाईट पद्धतीने उपचार करण्यात येत असल्याचे सांगत शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नापसंती व्यक्त केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या न्यायपीठाने दिल्लीमध्ये कोरोना बाधितांच्या उपचारात होत असलेल्या बेपर्वाईची स्वतः होऊन दखल घेतली होती. दिल्लीत कोरोना बाधितांच्या चाचण्यांचे प्रमाण कमी का आहे, याचे उत्तर दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारला दिले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा