आरोग्य सेतु ऍपसोबतच सर्व नागरिकांकडून पीएम केअर्ससाठी प्रत्येकी १०० रुपयांची वसुली

0
580

नवी दिल्लीः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आणि लक्षावधी लोकांचा रोजगार हिरावल्यामुळे कुटुंबाच्या भरणपोषणाचा प्रश्न निर्माण झालेला असतानाच आरोग्य सेतु ऍप डाऊनलोड करतानाच पीएम केअर्ससाठी सर्व नागरिकांकडून प्रत्येकी १०० रुपये योगदान वसूल करण्याचे फर्मान काही जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहे.

भारत सरकारने २ एप्रिल रोजी आरोग्य सेतु हा ऍप लाँच केला आहे. या ऍपच्या माध्यमातून आसपासच्या परिसरातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या बाबतची माहिती मिळवता येते. कोरोना संसर्गाच्या प्रसाराची जोखीम कळावी आणि गरज भासल्यास अलगीकरण करता येण्यासाठी या ऍपची मदत होईल, असे सांगण्यात आले आहे. या ऍपसंदर्भात भारत सरकारच्या वतीने २९ एप्रिल रोजी एक निवेदन जारी करण्यात आले आहे. ‘कोरोना विषाणूच्या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य सेतु ऍपचा प्रभावी वापर’ या शिर्षकाखाली देण्यात आलेल्या या निवेदनात केंद्र सरकारच्या अधीन काम करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्माचाऱ्यांना ( आऊटसोर्स कर्मचाऱ्यांसह) आपल्या मोबाइलमध्ये आरोग्य सेतु ऍप डाऊनलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. असे असतानाही हा ऍप डाऊनलोड करणे सर्वांसाठीच अनिवार्य केले जात आहे.

प्रशासनातील काही अधिकारी आरोग्य सेतु ऍप सर्वांनी डाऊनलोड करणे अनिवार्य करण्यापर्यंतच थांबले नाहीत तर त्यांनी लोकांकडून त्यांच्या मोबाइलवर आरोग्य सेतु ऍप डाऊनलोड करून घेण्याबरोबरच प्रत्येक नागरिकांकडून पीएम केअर्ससाठी प्रत्येकी १०० रुपयांचे योगदान वसूल करण्याचेही फर्मान काढले आहे. भदोहीचे जिल्हाधिकारी राजेंद्र प्रसाद यांनी २८ एप्रिल रोजी जारी केलेल्या कार्यालयीन आदेशानुसार सर्व विभागातील उपजिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना आरोग्य सेतु ऍप डाऊनलोड करून घेण्याचे टार्गेटच दिले आहे. शिवाय पीएम केअर्ससाठी लोकांकडून प्रत्येकी १०० रुपयांचे योगदान वसूल करण्याचेही निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींचा आक्षेपः आरोग्य सेतु ऍप डाऊनलोड करण्याची सक्ती आणि पीएम केअर्ससाठी प्रत्येकाकडून १०० रूपयांची वसुलीच्या मुद्यावर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी टिकास्त्र सोडले आहे. जनता त्राहीत्राही करत आहे. रेशन, पाणी, रोख रकमेची टंचाई आहे आणि सरकारी अधिकारी सर्वांकडून पीएम केअर्ससाठी शंभर-शंभर रुपये वसूल करत आहे. तेव्हा पीएम केअर्सचे सरकारी ऑडिटही झाले पाहिजे, हे सर्व दृष्टीने योग्य होणार नाही का? देशातून पळून गेलेल्या बँक चोरांचे ६८,००० कोटी माफ झाले, त्याचाही हिशेब झाला पाहिजे. संकटाच्या काळात पाददर्शकता महत्वाची आहे. त्यात जनता आणि सरकार या दोघांचेही भले आहे, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा