औरंगाबादेत ११ नवे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण, गारखेड्यात शिरकाव; एकूण रूग्णसंख्या १२० वर

0
856

औरंगाबादः औरंगाबादेतील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत चालली असून आज सकाळी ११ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. गारखेड्यात आज पहिला  कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला आहे. उर्वरित १० रूग्णांपैकी ९ जण नूर कॉलनीतील तर एक जण भीमनगर भावसिंगपुऱ्यातील आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांची एकू संख्या १२० वर गेली आहे. आतापर्यंत कोरोनाने ७ जणांचे बळी घेतले आहेत.

गेल्या तीनच दिवसांत औरंगाबादेतील कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झालेली पहायला मिळत आहे. सोमवारी एकाच दिवशी २९ आणि मंगळवारी २७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले होते. आज, मंगळवारी त्यात आणखी ११ रुग्णांची भर पडली असून अवघ्या तीन दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णांची संख्या ७६ आहे. संजयनगर, मुकुंदवाडी आणि पैठणगेट या नवीन भागात मंगळवारी शिरकाव केलेल्या कोरोनाने आज गारखेड्यातही शिरकाव केला. त्यामुळे कोरोनाच्या प्रभावाखालील शहरातील भागही हळूहळू वाढत चालले आहेत. त्यामुळे औरंगाबादकरांसाठी ही धोक्याची घंटा ठरू पहात आहे.

दरम्यान, आजवर आढळून आलेल्या एकूण १२० कोरोना बाधित रूग्णांपैकी ७ जणांचा मृत्यू झाला आहे तर २३ रूग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ९० कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पोलिसांनी शहरातील संचारबंदी आणखी कडक केली आहे. आता फक्त सकाळी ७ ते ११ या वेळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. काही लोकांच्यामुळे अख्खे शहर धोक्यात येत असेल तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा