राज्यात आज एकाच दिवशी १२२ कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद, २ हजार ५६० नवीन रूग्ण

0
108
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबई: राज्यात आज कोरोनाचे २ हजार ५६० नवीन कोरोना रूग्ण आढळून आले असून राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ७४ हजार ८६० झाली आहे. राज्यात आज एकाच दिवशी १२२ कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. एकाच दिवशी एवढ्या संख्येने मृत्यूची नोंद होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. राज्यात आजपर्यंत कोरोनामुळे २ हजार ५८७ लोकांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात ९९६ रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२ हजार ३२९  कोरोना बाधित रूग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात ३९ हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज राज्यात नोंद झालेल्या १२२ मृत्यूपैकी मुंबईत ४९, उल्हासनगर ३, ठाण्यात २, नवी मुंबईत ३, वसई विरारमध्ये १, भिवंडीत १, मीरा भाईंदरमध्ये १, धुळ्यात ४, जळगावमध्ये २, अहमदनगरात १, नंदूरबारमध्ये १, पुण्यात १९, सोलापुरात १०, २ कोल्हापुरात २, औरंगाबाद मनपा १६, जालना १, उस्मानाबादेत १, अकोल्यात २  तर इतर राज्यातील ३ रूग्णांचा मृत्यू झाला. आज झालेल्या मृत्यूंपैकी ७१ पुरुष तर ५१ महिला आहेत.  आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५७ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ३० एप्रिल ते ३१ मे या कालावधीतील आहेत.

८२ प्रयोगशाळांत  ५ लाख चाचण्याः सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३६ खाजगी अशा एकूण ८२ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ४ लाख ९७ हजार २७६ नमुन्यांपैकी ७४ हजार ८६० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ७१ हजार ९१५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाइन सुविधांमध्ये ७१ हजार ९१२ खाटा उपलब्ध असून सध्या ३३ हजार ६७४ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

रुग्णवाढीचा दर ७ वरून ४.१५ टक्क्यांवरः १ मे ते १ जून या कालावधीत राज्यातील रुग्ण वाढीचा वेग क्रमशः कमी होत असून दि.१ जून रोजी तो देशाच्या सरासरी पेक्षा ४.७४ टक्के देखील कमी झालेला आहे, हे स्पष्ट झाले. त्याचवेळी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढताना दिसत आहे. यावरुन राज्यातील कोरोना प्रसाराचा वेग मंदावत असल्याचे स्पष्ट होते आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा