औरंगाबादकरांना दिलासाः १४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले!

0
566

औरंगाबाद कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा तेराव्या दिवशीचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या या सहा जणांना सोमवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातून घरी पाठविले आहे, अशी माहिती डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. यापूर्वी, रविवारी पाच, सुरूवातीला आढळून आलेल्या एन-१ व एन-४ येथील दोन्ही कोरोना बाधित महिलांसह पदमपुरा येथील एकजण उपचारानंतर कोरोनामुक्‍त झाले आहेत. आजपर्यंत एकूण १४ रूग्ण कोरोनामुक्‍त आहेत. दरम्यान, सोमवारी आसेफिया कॉलनीतील ६५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

औरंगाबादेत आजपर्यंत एकूण ३२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला असून सध्या जिल्हा रुग्णालयात १३ तर घाटी रूग्णालयात दोन रूग्णावर उपचार सुरू आहेत. यापैकी दोघाजणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मागील आठवड्यात शहरातील सिडको एन-चार भागातील ५८ महिला कोरोनामुक्त झाली. या महिलेला १५ एप्रिल रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. शनिवारी याच महिलेची सात वर्षीय नात कोरोनामुक्त झाली. विशेष म्हणजे सातारा परिसरातील एकाच कुटुंबातील तिघे कारोनामुक्त झाले आहेत. त्यांनाही सुटी देण्यात आली.

जिल्हा सामान्य रुग्णालय, घाटी रुग्णालय व एका खासगी रुग्णालयातील डॉक्टर्स परिचारिकांसह इतर कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर शहरात मोठे आशादायक चित्र निर्माण होत आहे. सोमवारी कोरोनामुक्‍त झालेल्या सहा रुग्णांना घरी पाठविताना महापौर नंदकुमार घोडेले, मिनी घाटीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांची विशेष उपस्थिती होती. रविवारी पाचजण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी म्हणजेच आज सोमवारी पुन्हा सहा जण कोरोनामुक्त झाल्याने ३१ पैकी एकूण १४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तीन जणांचा मृत्यू झाला.

४८  संशयितांचे अहवाल येणे बाकी  सोमवारी पुन्हा ९६ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ५६ जणांना घरीच अलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. घाटीच्या प्रयोगशाळेत ४६ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहेत. तर काल आणि आजचे मिळून ४४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. प्रयोगशाळेतून एकूण ४८ स्वॅबचे नमुने येणे बाकी आहे, अशी माहिती डॉ. कुलकर्णी यांनी दिली.

ही तर मोठी उपलब्धीः घाटीतील डॉक्टरांच्या टीमने केलेल्या योग्य उपचाराने कोरोनाचे रूग्ण बरे होत आहेत. ही अतिशय चांगली व आम्हा डॉक्टरांचा आत्मविश्‍वास वाढवणारी बाब आहे. आजही आम्ही कोरोनामुक्त सहा रुग्णांना सुटी दिली आहे. आता शहरात कोरोनाचे १४ रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोनामुक्‍त झालेल्या १४ जणांना सुटी देण्यात आली आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी म्हणाले.

कोरोनामुक्त झालेले रुग्ण असेः

 • सिडको एन-१ येथील ५९ वर्षीय महिला.
 • सिडको एन-४ येथील ५८ वर्षीय महिला.
 • पदमपुरा येथील ४३ वर्षीय डॉक्टर.
 • सिडको एन-४ येथील सात वर्षीय मुलगी.
 • आरेफ कॉलनी ४५ वर्षीय महिला.
 • देवळाई येथील ३८ वर्षीय चालक.
 • रोशनगेट येथील ३७ वर्षीय तरुण.
 • पडेगाव येथील ३८ वर्षीय घाटीचा ब्रदर.
 • सातारा परिसर येथील २८ वर्षीय महिला.
 • सातारा परिसर येथील ३० वर्षीय पुरुष.
 • सातारा परिसर येथील ३०वर्षीय पुरुष.
 • अहबाब कॉलनी येथील २७वर्षीय महिला.
 • किराडपुरा येथील २२ वर्षीय तरुण.
 • आरेफ कॉलनीतील ३८ वर्षीय पुरुष.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा