दिल्लीत धार्मिक कार्यक्रमात सहभागी २०० लोकांत कोरोनाची लक्षणे, तेलंगणच्या ६ जणांचा मृत्यू

0
135

नवी दिल्ली/ हैदराबादः भारतात कोरोना विषाणू अद्याप सामूहिक संसर्गाच्या टप्प्यात पोहोचला नसल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालय करत असतानाच राजधानी दिल्लीच्या निजामुद्दिन भागात १३ ते १५ मार्चदरम्यान आयोजित एका धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या तब्बल २०० लोकांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे आढळून आली असून याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या तेलंगणातील सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. तेलंगण सरकारने अधिकृतपणे ही बाब मान्य केली आहे. या घटनेमुळे राजधानी दिल्लीसह देशभर खळबळ माजली आहे.

 दिल्लीच्या निजामुद्दिन भागात तबलिगी जमात या मुस्लिम संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात इंडोनेशिया, मलेशिया, श्रीलंकेसह अनेक देशांतून आलेल्या सुमारे २००० लोकांनी सहभाग घेतला होता. याच कार्यक्रमात देशाच्या विविध राज्यांतून ५०० लोक सहभागी झाले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर हे ५०० लोक आपापल्या राज्यात परत गेलेले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका आणखी वाढला आहे.

दिल्लीत ज्या २०० लोकांमध्ये कोरोना विषाणूची लक्षणे आढळून आली आहेत, ते सर्व निजामुद्दिन दर्गाह मशिदीत आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. ही लक्षणे आढळल्यानंतर सुमारे २००० लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. दिल्ली सरकार या परिसरातील प्रत्येक घर आता सॅनिटाइज करणार आहे. पोलिसांनी निजामुद्दिन परिसराची पूर्णतः नाकाबंदी केली असून ड्रोनद्वारे संपूर्ण परिसरावर नजर ठेवली जात आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सहा लोकांचा मृत्यू झाल्याचे तेलंगण सरकारने म्हटले आहे. तेलंगणच्या मुख्यमंत्री कार्यालयाने सोमवारी रात्री सांगितले की, दोन लोकांचा मृत्यू गांधी रूग्णालयात, एकाचा अपोलोमध्ये, एकाचा ग्लोबल रुग्णालयात तर एकाचा निजामाबाद आणि आणखी एकाचा गढवाल जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीने स्वतःहोऊन याबाबतची माहिती द्यावी, असे आवाहन तेलंगण सरकारच्या आरोग्य विभागाने केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा