औरंगाबादेतील रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ, दिवसभरात २१ पॉझिटिव्ह; एकूण रूग्णसंख्या १३०

0
204

औरंगाबाद: औरंगाबाद शहरात आज एकूण २१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या १३० वर गेली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटीत) ९१, घाटीत ०९ नवीन कोरोनाबाधितांवर तर अन्य एका जुन्या कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत, (हा रुग्ण पूर्वीचाच असल्याने नवीन रुग्ण म्हणून गृहित धरला जात नाही) अशा एकूण १०१ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असल्याचे सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले.

पॉझिटिव्ह आलेल्या नूर कॉलनीतील ११, किलेअर्कमधील दोन, असेफिया कॉलनीतील पाच, भीमनगर, भावसिंगपुरा येथील एक रुग्ण असे एकूण १९ रुग्ण जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल झाल्याने एकूण ९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. घाटीत नऊ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. अशा एकूण १०१ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये नवीन कोरोनाबाधित १०० आहेत. तर जुन्या रुग्णांपैकी एक रुग्ण परत उपचारासाठी दाखल झालेला आहे. एकूण मृत सात आणि बरे होऊन घरी परतणारे २३ असे एकूण १३० कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले आहेत.

जिल्हा सामान्य रूग्णालयात  ३३ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाची सिझेरियन होऊन त्या कोरोनाग्रस्त महिलेने एका चिमुकलीस जन्म दिलेला आहे. त्या महिलेची चाचणी निगेटिव्ह आल्याने ती महिलाही आज कोरोनामुक्त झाली. तिला डिस्चार्ज देण्यात आला. आज जिल्हा सामान्य रुग्णालयात २८ जणांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले. काल आणि आजचे मिळून ३५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाले.

घाटीत नऊ कोरोनाबाधितांवर उपचार सुरूः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) दुपारी चार वाजेपर्यंत २८  रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४ जणांचे स्वॅब घेण्यात आले. सहा जणांचा अहवाल निगेटीव्ह आलेला आहे. आठ जणांचा येणे बाकी आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये औरंगाबादेतील गुलाब नगर येथील ६४ वर्षीय पुरूष, गुरूदत्त नगर, गारखेडा परिसरातील ४७ वर्षीय पुरूष यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे घाटीत आता नऊ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या घाटीच्या डेडिकेटेड कोविड रुग्णालयात एकूण ४२ रुग्ण भरती आहेत. चार कोविड निगेटीव्ह रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. मागील चोविस तासात पळशी शहर, बिसमिल्ला कॉलनी येथे राहणाऱ्या नऊ महिने वयाच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे. तिचा अहवाल कोविड निगेटीव्ह आलेला आहे, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी कळवले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा