६४ टक्क्यांहून अधिक महाराष्ट्र अद्यापही कोरोनामुक्त, २३ जिल्हे प्रादुर्भावापासून दूर!

0
421

प्रमिला सुरेश/मुंबई

 जगभर थैमान घालणारा कोरोना विषाणुच्या संसर्गाने महाराष्ट्रातही पाय पसरालया सुरूवात केली असली तरी आजपर्यंत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी केवळ १३ जिल्ह्यांतच कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. २३ जिल्हे अद्यापही कोरोनाच्या प्रादुर्भावापासून दूर आहेत. टक्केवारीच्याच भाषेत बोलायचे झाल्यास एकूण जिल्ह्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा केवळ ३६.१२ टक्के भागच कोरोनाच्या प्रादुर्भावाने ग्रासलेला असून ६३.८८ टक्के भाग कोरोनामुक्त असून खबरदारीच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी केली तर हे प्रमाण एवढ्याच मर्यादित ठेवून कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्याचे सरकारी यंत्रणांचे प्रयत्न फलदायी ठरू शकतात.

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पालघर, रायगड, नागपूर, पुणे, सांगली, सातारा, यवतमाळ, अहमदनगर, रत्नागिरी आणि औरंगाबाद या १३ जिल्ह्यातील काही ठराविक भागातच कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. या जिल्ह्यांतील एखाद्या विशिष्ट शहरातच कोरोनाग्रस्त आढळले असले तरी या जिल्ह्यांचा बहुतांश भागही कोरोनामुक्तच आहे. परंतु या जिल्ह्यांचा अंशतः भाग म्हणजेच एखाद्या शहरात कोरोनाग्रस्त रूग्ण आढळलेला असल्यामुळे या जिल्ह्यांना कोरोनाग्रस्त जिल्हे संबोधण्यात येऊ लागले आहे. या जिल्ह्यांत झालेली कोरोना विषाणुची लागण याच जिल्ह्यात नियंत्रणात आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून प्रादुर्भाव पसरू नये म्हणून या जिल्ह्यांतील लोकांना अन्य जिल्ह्यांत जाण्यास प्रतिबंध म्हणून या जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, बीड, जालना, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर, सोलापूर, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव आणि सिंधुदुर्ग या २३ जिल्ह्यांतील एकाही शहरात अथवा गावात अद्याप तरी एकही कोरोनाचा रूग्ण आढळला नाही. म्हणजेच हे २३ जिल्हे सध्या तरी कोरोनामुक्त आहेत. हे प्रमाण राज्याच्या तब्बल ६३.८८ टक्के एवढे आहे. हे २३ जिल्हे कोरोनामुक्त ठेवण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील केल्या आहेत. कोरोनाबाधित जिल्ह्यांतील कोरोनाचा संसर्ग या जिल्ह्यात पसरू नये, म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी राज्यात संचारबंदी लागू करण्याची घोषणा करतानाही ज्या जिल्ह्यात कोरोनाची लागण झाली आहे, ती अन्य जिल्ह्यांत पसरू नये आणि कोरोनामुक्त जिल्ह्यांना कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये,म्हणून राज्यातील जिल्ह्यांच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्याचे सांगितले. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणारी सार्वजनिक वाहतूक बंद करण्यामागचाही राज्य सरकारचा हाच मुख्य हेतू आहे. महाराष्ट्रातील जनतेने स्वयंस्फूर्तीने सरकारच्या निर्देश आणि निर्बंधांचे काटेकोर पालन आपल्या, समाजाच्या आणि राज्य- राष्ट्राच्या हिताचे समजून केल्यास हा संसर्ग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न फलदायी ठरतील, अशी एकंदर स्थिती आहे. जगाच्या पाठीवर कोरोनाने ग्रासलेली राज्ये आणि राष्ट्रे अशाचन निर्देश आणि निर्बंधांच्या काटेकोर पालनातून कोरोनामुक्त झाल्याची नजीकच्या महिन्यांतील उदाहरणे आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा