पब्जी, लुडोमुळे २५ टक्के रूग्ण कोरोना संसर्गाची ‘शिकार’!

0
668
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबाद:  औरंगाबाद शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत चालली असतानाच आतापर्यंत आढळून आलेल्या कोरोना बाधित रूग्णांपैकी २५ टक्के  तरूण रूग्ण हे  पब्जी, कॅरम आणि पत्त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाला बळी पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

संपर्कातल्या संपर्कातून फैलाव झाल्यामुळे औरंगाबादेतील रूग्णसंख्या वाढू लागली आहे. एकीकडे संपर्काची ही साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी घरातच रहावे, असे आवाहन वारंवार करूनही तरूण वर्ग लॉकडाऊन काळात घराबाहेर पडून पब्जी, कॅरम आणि पत्त्यांचे डाव मांडत आहेत. अशांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी घेण्यात आली असता कोरोनाच्या संपर्काची साखळीच उघडकीस आली आहे.

औरंगाबादेतील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पहाता कोणतीही पूर्वसूचना न देताच सहा दिवसांचा शंभर टक्के लॉकडाऊन घोषित करण्यात आला.  त्यामुळे सहा दिवसांपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. याचाच फायदा घेत अनेक जण दिवस घालवण्यासाठी करमणुकीचे वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. घरात बसून वैतागलेल्या व्यक्ती आणि  तरूणांनी रिकामा वेळ घालवण्यासाठी शक्कल लढवली. गल्ली, मोहल्ला, वसाहतीत घोळक्याने एकत्र बसून पब्जी, लुडो, कॅरम आणि पत्त्यांचे डाव मांडले जात आहेत.

घोळक्यात ना तोंडाला मास्क, ना डिस्टंन्सिंगः दहा ते पंधरा व्यक्तींचा समूह एकत्र बसत असून, त्यांच्या तोंडाला ना मास्क, ना सोशल डिस्टंन्सिंगचा नियम पाळला जात आहे. पत्त्यांमध्ये तिर्रट, रम्मी, जुट हा डाव रंगत आहे. हजारो रुपये यावर लावले जात आहे. दिवसरात्र हा खेळ कोणतेही नियम न पाळता एखाद्या रिकाम्या घरात, अर्धवट बांधकाम झालेल्या इमारती आणि आडरानात मोकळ्या जागेवर खेळला जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

खेळाच्या जागीच चहा नाश्त्याची व्यवस्थाः पब्जीसह कॅरम, पत्ते, लुडो हा खेळ खेळण्यासाठी अर्धवट बांधकाम झालेल्या इमारती, रिकामा प्लॉट अशी जागा शोधून त्या ठिकाणी या खेळांचा डाव रंगत आहे. या ठिकाणी खेळणार्‍यांसाठी बसल्या जागी चहा, नाश्ता, पाणी, जेवणाची व्यवस्था केली जाते. त्याबद्दल प्रत्येक डावामध्ये केटी वसूल होते. दररोज केटीची वसुली ही लाखोच्या घरात आहे.

या वसाहतींतून आढळले पब्जीमुळे संक्रमितः शहरातील सातारा गाव परिसर, पुंडलिकनगर, हुसेन कॉलनी, संजयनगर, रामनगर, बुढीलेन, रोशनगेट, कटकटगेट, सिल्कमिल कॉलनी, जयभीमनगर, भवानीनगर, जुना मोंढा, बहादूरपुरा या भागात आढळून आलेल्या कोरोना बाधितांपैकी २५ टक्के बाधित हे पत्ते, कॅरम, लुडो, पब्जी हा खेळ खेळत असताना संपर्कात आल्यामुळे कोरोना संक्रमित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बाधित व्यक्तींच्या संपर्कातील संशयित व्यक्तींची कोरोना चाचणी घेतली जात असताना या व्यक्तींकडून याचा खुलासा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा