औरंगाबादेत एकाच दिवशी आढळले तब्बल ३० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण रूग्णसंख्या ८३ वर

तब्बल १,५२३ जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात, ४,६२४ जण संशयित

1
441

औरंगाबादः औरंगाबादकरांसाठी धक्कादायक बातमी आहे. सोमवारी दिवसभरात तब्बल ३० कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ८३ वर गेली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात रूग्ण संख्या वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली असून औरंगाबादकरांच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा मानली जाऊ लागली आहे.

औरंगाबाद शहरात १५ मार्च रोजी पहिला कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्यानंतर तब्बल पंधरा दिवस एकही कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळला नव्हता. मात्र दोन एप्रिलपासून शहरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत गेले. सोमवारी दिवसभरात तब्बल ३० कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. आधीच कोरोनाच्या रेड झोनमध्ये असलेल्या औरंगाबाद शहरात एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या आढळल्याने शहरातील कोरोना विषाणूच्या फैलावाचा धोका वाढल्याचेच हे द्योतक आहे. हे ३० रूग्ण आढळून आल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने हे रूग्ण रहिवासी असलेला भाग तातडीने सील केला आहे.

१,५२३ जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातः औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची संख्या तब्बल १,५२३ आहे. आरोग्य यंत्रणा संशयित आढळून आलेल्या ४,६२४ लोकांचा पाठपुरावा करत आहेत. सोमवारी ११२ लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

 एकूण संशयितांची संख्या ४,६२४- औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी १४२ संशयित रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील एकूण कोरोना संशयितांची संख्या ४,६२४ वर पोहोचली आहे. सोमवारी ३० जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात १,१५५ रुग्ण भरती आहेत. ३१ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत, तर ३० जणांचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १,६११ जणांचे नमुने तपासणीसाठी  घेण्यात आले आहेत.

आणखी एका रूग्णाचा मृत्यू, मृतांची संख्या ६- शहरात आणखी एका कोरोना बाधित रूग्णाचा सोमवारी मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात किलेअर्क येथील ६० वर्षीय कोरोना बाधित महिलेला २५ एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, सोमवारी दुपारी साडेबारा वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या ६ झाली आहे. सायंकाळी पुन्हा तीन संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह निघाले. यात एका पाच वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे.

 आरोग्य यंत्रणेसमोर आव्हानः औरंगाबाद शहरात सातत्याने कोरोना रूग्णांची संख्या वाढत जात आहे. त्यामुळे आरोग्य विभाग व सर्व शासकीय यंत्रणांची झोप उडाली आहे. आजघडीला शहरात कोरानो बाधित रूग्णांची संख्या ८३ वर पोहोचली आहे. दौलताबाद येथील एक महिलाही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे कोरोनाने ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. शहरी भागातील कोरोना संसर्गाचा फैलाव ग्रामीण भागात होण्यापासून रोखणे हे आरोग्य यंत्रणेपुढे मोठेच आव्हान आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा