लॉकडाऊनच्या काळात राज्यात पोलिसांवर २४६ हल्ले, ८२७ लोकांना अटक

0
62
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख १२ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. पोलिसांवर हल्ला होण्याच्या २४६ घटना घडल्या. त्यात ८२७ व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे २२ मार्च ते २२ मे या कालावधीत कलम १८८ नुसार १ लाख १२ हजार ७२५ गुन्हे नोंद झाले असून २२ हजार ७५३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ५ कोटी २२ लाख ९८ हजार ४७७ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वॉरंटाइन असा शिक्का आहे अशा ६८० व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. राज्यात एकूण ४ लाख ९७ हजार ७०५ व्यक्ती क्वॉरंटाइन आहेत, असे देशमुख म्हणाले.

१ हजार १२३ पोलिसांना कोरोनाची बाधाः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात मुंबईतील १० पोलीस व १ अधिकारी असे एकूण ११, पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण १, ए.टी.एस.१ ठाणे शहर १ व अशा १८ पोलीसवीरांना आपला जीव गमवावा लागला. राज्यात सध्या १३२ पोलीस अधिकारी व ९९१ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

मदत शिबिरांत १ लाख १६ हजार लोकांची व्यवस्थाः राज्यात एकूण १६८० मदत शिबिरे आहेत. या मदत शिबिरांत जवळपास १ लाख १६ हजार ७१७  लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. लॉकडाऊनच्या काळात सर्व नियमांचे पालन करून कोरोनाशी मुकाबला करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा