परदेशी गुंतवणुकदारांसाठी राज्यात ४० हजार हेक्टर जमीन राखीव, थेट उद्योग सुरू करण्याची सुविधा!

0
20

मुंबईः महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ वाढावा आणि परदेशी गुंतवणुकदार आकर्षित व्हावेत म्हणून एमआयडीसीने राज्याच्या विविध भागात ४० हजार हेक्टर जमीन राखीव ठेवली असून त्यांना एमआयडीसी बाहेरील जमीन खरेदी करून उद्योग सुरू करण्यासही चालना देण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी एमआयडीसी औद्योगिक शेड उभे करून देणार आहे. विविध परवान्यांऐवजी महापरवाना घेऊन उद्योग सुरू करता येईल. याशिवाय एमआयडीसीबाहेरील जमीन अधिग्रहित करून उद्योग सुरू करण्यास चालना दिली जाईल. विदेशी गुंतवणुकदारांसाठी एमआयडीसीने राज्याच्या विविध भागांत सुमारे चाळीस हजार हेक्टर जमीन राखीव ठेवली आहे. यामध्ये पाणी, वीज रस्ते आदी पायाभूत सुविधा सज्ज ठेवल्या आहेत. गुंतवणूक करार केल्यानंतर थेट उत्पादन सुरू करण्यासाठी एमआयडीसी स्वखर्चाने औद्योगिक शेड उभे करणार आहेत. या ठिकाणी प्ले अँड प्लगद्वारे थेट उद्योग सुरू करता येईल, असे देसाई म्हणाले.

मनुष्यबळासाठी कामगार ब्युरोः राज्यात उद्योग वाढीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने खुले धोरण स्वीकारले आहे. विविध परवान्यांचा जाच कमी करून महापरवाना दिला जाईल. उद्योग सुरू झाल्यांतर पुढील एक दोन वर्षांत इतर विभागांचे परवाने घेण्याची मुभा दिली जाईल. मनुष्यबळाची टंचाई भासू नये यासाठी कामगार ब्युरोची स्थापना करण्यात येणार आहे. याद्वारे उद्योगांना लागणारे कुशल, अकुशल मनुष्यबळ अवघ्या सात दिवसांत पुरवण्याचे नियोजन उद्योग विभागाने केले आहे, असेही देसाई म्हणाले.

महाराष्ट्रात या आणि उद्योग सुरू कराः विदेशी गुंतवणूकदारांच्या सल्लागारांसोबत उद्योग विभागाचे अधिकारी चर्चा करत आहेत. याशिवाय विविध देशांच्या वाणिज्य दूतांसोबत चर्चा केली जाईल. कोरोनाच्या संकटासोबत संधीही निर्माण होते. कोरोनामुळे राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. त्याचा देश-विदेशातील गुंतवणुकदारांनी फायदा घ्यावा असे आवाहन देसाई यांनी केले. ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज व वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या वतीने शुक्रवारी आयोजित वेबिनारदरमध्ये ते बोलत होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा