धोका शंभरीजवळः औरंगाबादेत २४ तासांतच कोरोनाचे ४२ रूग्ण, एकूण रूग्णसंख्या ९५ वर

0
186
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः मागील २४ तासांत औरंगाबाद शहरात तब्बल ४२ संशयितांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सोमवारी दिवसभरात २९ आणि आज सकाळी १३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे शहरातील एकूण रूग्णांची संख्या आता ९५ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे दीडहजारपेक्षा अधिक नागरिक या रूग्णांच्या संपर्कात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी दिवसांत औरंगाबादेत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे.

१५ मार्चला पहिली कोरोनाग्रस्त महिला निघाल्यानंतर सुमारे पंधरा दिवस शहरात एकही कोरोना रूग्ण आढळला नाही. त्यामुळे औरंगाबादकरांना चांगलाच दिलासा मिळाला होता. मात्र मुंबई व पुण्याहून आलेले दोनजण २ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आणि पुन्हा औरंगाबादकरांची झोप उडाली. तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने संशयितांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येत असून रोज रूग्णांच्या संख्येत वाढत होत आहे. यातच सोमवारी सकाळपासून मंगळवारी सकाळपर्यंत अशा चोवीस तासांत सुमारे ४२ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. ही शहरातील आजपर्यंतची सर्वांत मोठी वाढ आहे. शहरातील किलेअर्क हा भाग कोरोना हॉटस्पॉट म्हणून समोर आला आहे. मागील २४ तासात या भागात २७ रूग्ण आढळले असून हा भाग पोलीस व महापालिका प्रशासनाने तातडीने सील केला आहे. सोमवारी एकाच दिवसात २९ कोरोना बाधित आढळल्यानंतर मंगळवारी सकाळीच पुन्हा १३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती घाटी रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

चिमुकलेही कोरोनाच्या विळख्यातः मंगळवारी आलेल्या अहवालानुसार, एक रुग्ण भीमनगर भावसिंगपुरा येथील आहे. तर १२ रुग्ण किलेअर्क भागातील आहेत. यात ६ रुग्ण सोळा वर्षांखालील असून ३ पुरुष व ४ महिला असे सात जण ४४ वर्षांखालील आहेत, अशी माहिती घाटीतील डॉक्टरांनी दिली. तत्पूर्वी, सोमवारी आलेल्या अहवालातही एक पाच वर्षांची चिमुकली व एका दोन वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश आहे.

सर्वाधिक रूग्ण असलेले हॉटस्पॉटः
किलेअर्क-पंचकुवॉः २७
नूर कॉलनीः १२
समतानगरः ९
आसेफिया कॉलनीः ६
भीमनगर-भावसिंगपुराः ५
पाच भागातील रूग्णसंख्याः ६९

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा