कोरोनाचे संकटः ४७ टक्के मृत्यू एकट्या महाराष्ट्रात, देशातील ४ शहरांत तब्बल ६१ टक्के मृत्यू!

0
58

नवी दिल्लीः कोरोना विषाणूच्या संसर्गाने देशभरात ३९२ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात एकट्या महाराष्ट्रातील मृतांची संख्या १८७ आहे. देशातील एकूण मृतांच्या तुलनेत महाराष्ट्राचे हे प्रमाण ४७ टक्के आहे. शहरांच्या दृष्टीने विचार केला तर मुंबई, पुणे, इंदूर आणि दिल्ली या चारच शहरांत कोरोनाने २३२ लोकांचे बळी घेतले आहेत. म्हणजेच देशातील एकूण मृतांच्या संख्येच्या तुलनेत या चार शहरांतील मृतांचे प्रमाण ६१ टक्के आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव काही राज्यांतच जास्त असून मृतांचे प्रमाणही काही शहरांतच जास्त आहे.

लॉकडाऊन घोषित केल्यानंतरही कोरोना विषाणूचा फैलाव थांबला नाही. १४ दिवसांपूर्वी म्हणजेच २९ मार्च रोजी देशातील १६० जिल्हे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाखाली होते त्यांची संख्या वाढून १२ एप्रिल रोजी ३६४ जिल्हे झाली आहे. याचाच अर्थ देशातील ७१८ जिल्ह्यांपैकी अर्ध्याहून अधिक जिल्हे कोरोनाच्या प्रादुर्भावाखाली आले आहेत. देशाच्या एवढ्या भागात कोरोना विषाणूचा फैलाव झाला असला तरी त्याचा प्रभाव काही ठिकाणी खूपच जास्त आहे.

देशभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जवळपास ११ हजार ९३३ आहे. त्यात सर्वाधिक २९१६ रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. त्यानंतर दिल्लीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५७८ असून मृतांची संख्या ३२ आहे. केंद्र सरकारने देशात १७० कोरोना हॉटस्पॉट आणि २०७ संभाव्य हॉटस्पॉट जाहीर केले आहेत. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे राजस्थानमध्ये कोरोनाचा मृत्यूदर अत्यंत कमी आहे. राज्यात ९६९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यापैकी आतापर्यंत केवळ ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदराचे हे प्रमाण केवळ ०.३ टक्के आहे.

शहरांच्या दृष्टीन विचार केला तर पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यूदर १० टक्के राहिला आहे. इंदूरमध्ये प्रत्येक ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. मुंबई आणि दिल्लीमध्ये मृत्यूदर अपेक्षेप्रमाणे कमी आहे. मुंबईत प्रत्येक १६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एकाचा तर दिल्लीत ५२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा